Header Ads Widget


अब्दुलखालिक फाउंडेशनचे युवा नेतृत्व खलीक जसीम शेख यांची नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत आयोजित राष्ट्रीय टीबी कार्यशाळेसाठी निवड

शहादा, जि. नंदुरबार | प्रतिनिधी : जुनैद अहेमद 

अब्दुलखालिक एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशनसाठी अभिमानाची बाब म्हणजे संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष खलीक जसीम शेख यांची राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित कार्यशाळेसाठी निवड करण्यात आली आहे. “नॅशनल यूथ लीडरशिप वर्कशॉप ऑन टीबी अँड डीआर-टीबी” या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन २७ ते २८ मार्च २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर (NIHFW) येथे करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा YOUNITE India या युवा-नेतृत्वाखालील राष्ट्रीय व्यासपीठामार्फत आयोजित करण्यात येत असून भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत सेंट्रल टीबी डिव्हिजन (CTD) यांच्या सहकार्याने तसेच TB Alliance च्या “Fast Track the Cure (FTTC)” उपक्रमाच्या सहयोगाने पार पडणार आहे. देशातून निवडक युवा नेत्यांची निवड करून त्यांना क्षयरोग निर्मूलनासाठी सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भारत सरकारच्या “टीबी मुक्त भारत २०२५” या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या कार्यशाळेत युवकांना टीबी व औषध-प्रतिरोधक टीबी (DR-TB) संदर्भातील तांत्रिक ज्ञान, नेतृत्वगुण आणि समुदाय स्तरावर प्रभावी काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. “युवा फॉर टीबी मुक्त भारत: एम्पॉवरिंग यूथ, एलिमिनेटिंग टीबी!” या संकल्पनेतून युवकांना देशाच्या सार्वजनिक आरोग्य मोहिमेत सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

खलीक जसीम शेख यांची ही निवड त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्य, युवक संघटन आणि जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल म्हणून करण्यात आली आहे. खलीक जसीम शेख हे “यंगेस्ट एनजीओ फाउंडर” या जागतिक विक्रमाचे मानकरी असून त्यांनी अल्पवयातच सामाजिक कार्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयोजकांकडून सहभागींसाठी प्रवासाची व्यवस्था करण्यात आली असून मुंबई येथून फ्लाइट तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

खलीक जसीम शेख यांनी यापूर्वी विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे युवकांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या राष्ट्रीय निवडीमुळे नंदुरबार जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करणारी ही अभिमानास्पद बाब ठरत आहे. या कार्यशाळेतून मिळणारे ज्ञान व अनुभव भविष्यात ग्रामीण व शहरी भागातील टीबीविरोधी जनजागृती मोहिमांना अधिक बळ देणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments

|