Header Ads Widget


नंदुरबार येथे २ गटात तुफान दगडफेक ! २५ हुन अधिक लोकांना अटक


नंदुरबार – शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तुफान दगडफेक झाली. समाजकंटकांनी दगडांसह काचेच्या बाटल्या फेकल्याने मोठे नुकसान झाले असून तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी २५ हून अधिक जणांना अटक केली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या महाराष्ट्र व्यायामशाळेजवळ मंगळवारी रात्री किरकोळ वादातून दोन गटात दगडफेक झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अप्पर अधीक्षक नीलेश तांबे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.  अश्रुधुराच्या कांड्या फोडत पोलिसांनी अर्ध्यातासात परिस्थिती नियंत्रणात आणली.


दगडफेकीत तीन ते चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी १० पर्यत २५ जणांना अटक करुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी, शहर निरीक्षक रवींद्र कळमकर,  निरीक्षक दीपक बुधवंत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार खेडकर,  तालुका निरीक्षक राहुल पवार यांच्यासह पोलीस फौजफाटा आणि राज्य राखीव दलाची एक तुकडी  तैनात करण्यात आली आहे. 


दरम्यान, बुधवारी सकाळपासून परिसरातील सर्व व्यवहार सुरळीत  झाले असून पोलिसांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दगड आणि काचा गोळा करत रस्ता मोकळा केला. उपद्रव प्रकरणी दोषींवर कडक कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी दिले आहेत. पोलिसांची समाज माध्यमावरही नजर असून अफवा पसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments

|