Header Ads Widget


शहादा शहरातील मलोनी परिसरातील प्रभाग क्रमांक १ मधील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित

 शहादा | प्रतिनिधी जुनैद अहमद





शहादा शहरातील मलोनी परिसरातील प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांना आजही अनेक मूलभूत सुविधांचा अभाव भासत असून स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या परिसरात अद्यापही योग्य गटार व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावरच साचत असून परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.

गटारींच्या अभावामुळे साचलेल्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या घातक आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. परिसरातील लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच महिला यांना याचा मोठा फटका बसत असून अनेक नागरिक ताप, अंगदुखी, सर्दी अशा आजारांनी त्रस्त आहेत.

स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा नगरपालिकेकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होत असून रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरते तसेच चालणेही कठीण होते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

"कर भरूनही आम्हाला मूलभूत सुविधा मिळत नाहीत. गटारी, स्वच्छ रस्ते आणि आरोग्य सुविधा ही आमची मूलभूत गरज आहे,” अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य गटार व्यवस्था, डास प्रतिबंधक उपाययोजना आणि स्वच्छतेची कामे हाती घ्यावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जर लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत, तर परिसरात साथीचे रोग पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे याबाबतचे निवेदन परिसरातील नागरिकांनी मा. नगराध्यक्ष तसेच मा. मुख्याधिकारी, शहादा नगरपालिका यांना दिले आहे. 

Post a Comment

0 Comments

|