Header Ads Widget


वसंतराव नाईक महाविद्यालयात 'अभिव्यक्ती कौशल : विविध आयाम' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न...


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी प्रा.गणेश सोनवणे:
शहादा येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात हिंदी विभागातर्फे हिंदी दिवसाचे औचित्य साधत 'अभिव्यक्ती कौशल : विविध आयाम' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सचिव वर्षा जाधव, सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे प्रशासकीय प्रमुख मा. प्रा. हिमांशु जाधव यांच्या प्रेरक मार्गदर्शनाने कार्यशाळा आयोजिली होती. याप्रसंगी अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य प्रो. डॉ. संतोषकुमार पाटील यांच्यासह प्रा. अजित चव्हाण, हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक तायडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनोजकुमार गायकवाड प्रा. डॉ. रवींद्र पाटील यावेळी मंचावर उपस्थित होते.

या कार्यशाळेत आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य प्रो. डॉ. संतोषकुमार पाटील म्हणाले की, देशाची भाषा आणि संपर्क भाषेच्या रूपात हिंदी भाषेला आपण आपल्या जवळ अनुभवतो. भाषेचा व्यावहारिक उपयोग प्रभावी पद्धतीने करण्यासाठी आपल्याला हिंदी कडे भाषा विषयाच्या दृष्टीने पहावे लागेल. भाषेचे कौशल्य आत्मसात करून हिंदी भाषेला समृद्ध करण्यासाठी सर्वांना सोबत यायला लागेल. कारण हिंदी भाषेने साऱ्या भारताला एका सूत्रात गुंतून ठेवले आहे. आपली अभिव्यक्ती नेहमी खरी आणि सकारात्मक असायला हवी. आपल्या सक्षम भाषा अभिव्यक्ती कौशल्यामुळे स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील परिषद गाजवली होती. एखाद्या राष्ट्राचे स्वरूप हे राष्ट्रभाषेमुळेच बनते. हिंदी ही सामान्य लोकांची भाषा आहे. देशभरातील संप्रेषणाचे हिंदी महत्त्वपूर्ण माध्यम आहे. याप्रसंगी त्यांनी सागरा सारख्या अथांग अशा हिंदी भाषेवर प्रेम करत हिंदीचा स्वीकार करण्याचे आवाहन करून सर्वांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

          या कार्यशाळेचा आरंभी प्रा. अजित चव्हाण यांनी हिंदी भाषेचे महत्व पटवून देत सांगितले की, ऐकणे, बोलणे, वाचन करणे आणि लिहिणे ही सर्व कौशल्ये भाषा अभिव्यक्तीची माध्यमे आहेत. लिहिणे हा शब्द संस्कृत भाषेतून आला, ज्याचा अर्थ निपुणतेशी संबंधित आहे. आपण ज्या कार्याला शब्दांद्वारे अभिव्यक्त करतो, त्या कार्याला लिहूनही व्यक्त करता येते. माणूस आपल्या भावनांना बोलण्याऐवजी लिहून व्यक्त करण्यात सहजता अनुभवतो. आतापर्यंत झालेला विकास हा भाषेच्या माध्यमाने झाला असल्याचे विद्वानांचे मत आहे. हिंदी या विकासाची व संपर्काची एक महत्त्वाची भाषा आहे. हिंदी भाषा संपर्कासाठी आवश्यक आहे. हिंदी वर्तमान आणि भविष्याच्या आधार आहे. असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेच्या अवलंब करण्याचे आवाहन केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक तायडे तर प्रस्तावना व आभार प्रकटन प्रा. अजित चव्हाण यांनी केले. हिंदी दिवसानिमित्त आयोजिलेल्या या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments

|