Header Ads Widget


सामाजिक क्षेत्रातील गजानन साटोटे यांची विधानपरिषदेवर निवड करावी.-अ.भा.भोई समाज सेवा संस्थेची मागणी.

 



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:
गजानन रामकृष्ण साटोटे (रा. संभाजीनगर) यांची महाराष्ट्र राज्य सामाजिक क्षेत्रातून विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवड करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांचेकडे केली आहे.

   मुख्यमंत्री ना.शिंदे यांना मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून भोई समाज सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिले आहे.पत्राचा आशय असा, राज्यात भोईसह तत्सम मासेमारी करणाऱ्या 40 जातींची लोकसंख्या 50 लाखाच्या जवळपास आहे. हा समुह पोटाची खडगी भरण्यासाठी जल, जंगल, जमीनीशी निगडीत सह्याद्री पर्वत रांगेतील कानाकपाऱ्यात, सातपुडा पर्वताच्या दऱ्याडोंगऱ्यात, विदर्भातील माळमाथ्यावर, समुद्राच्या किनारपट्टीवर, नदीतिरी अशा दुर्गम व अतिदुर्गम स्थळी पारंपारिक वास्तव्यास आहे. सततची भटकंती, फिरस्ती जीवनामुळे शैक्षणिक आणि सामाजिक जीवनाच्या रिंगणाबाहेर आणि देशाच्या व राज्याच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर फेकला गेला आहे. अशा अडीअडचणी आणि समस्यांमुळे या समाजापुढे अनेक संकटे निर्माण झाली आहेत.ही आदिम जलवंशीय भटकी वन्य जमात, देशाचे खरे भूमीपूत्र, राज्यातील अधिवास असलेल्या या समुहाचे अनंत प्रश्न आणि समस्या आहेत. ज्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होवून 76 वर्ष झाली, मात्र अद्यापपर्यंत सुटलेल्या नाहीत. राज्य स्तरावर शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रश्नांची उकल व सोडवणूक करण्यासाठी त्या विधीमंडळ- विधान परिषदेच्या पटलावर मांडणे गरजेचे आहे. जेणे करुन आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवून उपाययोजना ठोसपणे राबवून या घटकाचे उत्थान होवून जीवनस्तर सुधारेल आणि राज्याच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग सुकर होईल. मात्र दुर्दैव असे की, आजतागायत या समस्यांच्या मांडणीकरीता राज्यात या दीनदुबळ्या आणि दुर्लक्षित समाजातील कोणत्याही समाजसेवक कार्यकर्त्यांची समाजिक क्षेत्रातून कायदे मंडळावर सदस्य प्रतिनिधी म्हणून निवड झालेली नाही.समाज सेवक श्री.गजानन रामकृष्ण साटोटे यांचे समाजाच्या हक्क व अधिकारासाठी जनजागृती मेळावे घेणे, गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रोत्साहनपर कार्यक्रम घेणे, त्यांना शैक्षणिक कामासाठी मदत आणि मार्गदर्शन करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिर भरविणे, समाजाचे आरोग्य शिबिर घेणे, भारतीय संविधान संदर्भात प्रबोधनपर शिबिर आयोजित करणे अशा प्रकारची विविध स्तरावर सामाजिक उपक्रम राबवून राष्ट्रीय पातळीवर संपूर्ण देशात त्यांचे प्रसिध्दीपासून दूर राहून निस्वार्थपणे दीनदुबळ्या जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत समाजकार्य चालू असते.करीता, या घटकातील समाजाची तळागाळातील समस्यांची माहिती व जाणीव असलेले निष्कलंक, प्रामाणिक, स्वच्छ प्रतिमेवे, अभ्यासू आणि धडाडीचे समाजसेवक प्रतिनिधी श्री. गजानन रामकृष्ण साटोटे यांची संपूर्ण राज्यातून सामाजिक क्षेत्रातून विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवड करुन त्यांना संपूर्ण भोई समाज, भटके विमुक्त जाती जमाती, ओबीसी समाज अशा सर्व जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी.पत्रावर अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. एकनाथ काटकर, कार्याध्यक्ष सुपडू खेडकर, रामकृष्ण शंकर मोरे,काशिनाथ खेडकर,भाईदास मोरे,रामदास मोरे,गुलाब ढोले आदि पदाधिकारींच्या स्वाक्षरी आहेत.पत्राची प्रत आ.बच्चूभाऊ कडू यांना दिली आहे.

Post a Comment

0 Comments

|