Header Ads Widget


अण्णाभाऊ साठेंचे कार्य कष्टकरी जनतेत चैतन्य निर्माण करणारे. -मुकेश कापुरे (तळोदा)

 

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:इतिहास संघर्ष करणाऱ्यांच्या लिहिला जातो. अण्णाभाऊ साठे यांनी गिरणी कामगार, कष्टकरी जनतेसाठी संघर्षातून जागृतीचे कार्य केले.त्यांनी केलेले लेखन समाजात चैतन्य निर्माण करणारे होते, असे प्रतिपादन मुकेश कापुरे (तळोदा) यांनी केले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथील टाऊन हॉलमध्ये आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अरविंद कुवर होते. यावेळी माजी नगरसेवक नानाभाऊ निकम, तात्याजी पवार, भैय्या चौधरी, प्रा.नेत्रदीपक कुवर, लक्ष्मण अहिरे, निलेश गायकवाड, मोहन पवार, अशोक बेहडे, माधव बेहडे, भरत अहिरे,राजू बेहडे, रामा नथू अहिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

     श्री‌.कापुरे व्याख्यानात पुढे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांचे जीवन एक संघर्ष कथा आहे. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे ते शालेय शिक्षणापासून वंचित राहिले. मात्र स्वतः अनुभवलेले प्रसंग त्यांनी कथा,कादंबरी,कविता, गीत, पोवाडे आदिंच्या माध्यमातून समाजापुढे मांडले. दीनदलित, कष्टकरी जनतेला जागृत करण्यासाठी त्यांनी आयुष्य खर्ची केले.त्यांच्या कथेतील नायिका अन्यायाच्या प्रतिकार करणारी होती. वारणेच्या वाघ या कादंबरीतील मुख्य पात्र महिलांचा आदर सन्मान करणारे आहे. कष्टकरी जनतेला अधिकार मिळावा यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांचे लेखन पुरस्कार प्राप्तीसाठीचे नसून माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क मिळावेत यासाठी होते.यावेळी तात्याजी पवारांनी विचार व्यक्त करतांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विविध पैलू बोली भाषेतून सहज सोप्या पद्धतीने समजावले. ते म्हणाले, मातंग समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गुरुस्थानी मानले. त्यांनी आयुष्यभर वंचित, कष्टकरी समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कार्य केले. अण्णाभाऊंच्या जीवन संघर्ष हा समाज व्यवस्थेच्या विरोधात होता. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर उभी नसून कष्टकऱ्यांच्या तळहातावर उभी असल्याचे त्यांनी सांगून समाज जागृती निर्मितीचे अजरामर कार्य केले. यावेळी प्रियंका गायकवाड व प्रांजल पाचुरणे या शालेय विद्यार्थिनींनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यावरून प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सूत्रसंचालन चेतन अहिरे यांनी केले. आभार लक्ष्मण अहिरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी महेंद्र पानपाटील, नरेश बेहडे, गणेश अहिरे, संदीप अहिरे, रोहन अहिरे, सागर बेहेडे, पंकज वाघ, विशाल बेहडे, अधिकार बेहडे, आकाश पाचुरणे, श्याम खैरनार, अजय बेहडे, अमोल अहिरे, संदीप बेहडे, मनोज बेहडे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|