Header Ads Widget


अली अल्लाना औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत विद्यार्थी संवाद..

 


अक्कलकुवा प्रतिनिधी/इलियास शेख:
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत जामिया संचालित अली अल्लाना औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय, अक्कलकुवा येथे विद्यार्थी संवाद कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला करिअर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या करिअरचे नियोजन कसे करावे याबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी सुखी आणि समृद्धी आयुष्यासाठी करिअरचा ई.एम.आय. म्हणजे काय आणि तो कसा भरावा हे काव्यरूपाने सांगितले. तसेच, विविध पुस्तकांचे वाचन करून आपले आयुष्य कसे बदलवता येते हे समजावून सांगितले आणि करिअर कट्टा मार्फत या सर्व पुस्तकांची उपलब्धता असल्याचे सांगितले.यानंतर डॉ. महेंद्र रघुवंशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत आणि परिश्रम आवश्यक आहे आणि यश मिळेपर्यंत माघार घेऊ नका. कारण यश प्राप्त झाल्यानंतर मिळणारा आनंद आपल्या कुटुंबाची समाजातील प्रतिष्ठा उंचावतो. त्यामुळे आर्थिक परिस्थितीची काळजी न करता परिश्रम करा आणि प्रत्येक अडचणींवर मात करा.या प्रसंगी जामिया कॅम्पसचे अध्यक्ष यांनीही संबोधित केले आणि महाविद्यालयात स्थापन केलेल्या 'सेंटर ऑफ एक्सीलन्स' विषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हे सेंटर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी उत्कृष्ट संधी प्रदान करेल. याच्या माध्यमातून विद्यार्थी आधुनिक विज्ञान आणि कला यामध्ये निपुणता प्राप्त करू शकतील आणि भविष्यात उत्तम करिअर घडवू शकतील. त्यांनी या उपक्रमाला शिक्षणाच्या दर्जा उंचावण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल असे म्हटले.या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जावेद खान, प्रमुख मार्गदर्शक यशवंत शितोळे, डॉ. महेंद्र रघुवंशी, डॉ. अकील सय्यद, डॉ. बशीर पटेल, डॉ. सय्यद कमालोद्दीन, डॉ. सऊद खान, डॉ. मनोज मुधोळकर, डॉ. मोहम्मद तारिक, प्रा. आशीष वसावे, डॉ. एजाज अहमद, प्रा. इम्रान कलाम, प्रा. आतिफ शेख (करिअर कट्टा समन्वयक) यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सिद्दीक पटेल यांनी केले तर प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. मजाज काझी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्रा. आशीष खैरनार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी करिअर कट्टा मंत्रीमंडळाची स्थापना करून शपथविधी करण्यात आला आणि मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

|