Header Ads Widget


शहादा नगरपालिकेचे सांडपाणी गोमाईनदीत टाकल्याने शहरालगत व नदीकाठी असलेल्या पिंगाणे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात ...


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा.गणेश सोनवणे:शहादा येथील नगर पालिकेचे सांडपाणी गोमाईनदीत टाकल्याने शहरालगत व नदीकाठी असलेल्या पिंगाणे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून डास, मच्छरांनी झोपनेही दुरापास्त केले आहे.शिवाय नदीपात्राला जलपर्णीने विळखा घातला आहे.यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी निवेदनाद्वारे पिंगाणे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. निवेदनाचा प्रति शहादा पालिकेचे मुख्याधिकारी, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, खासदार हिना गावित यांनाही देण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंगाणे गावालगत गोमाई नदीत शहादा नगर पालिकेचे सांडपाणी अनेक वर्षापासून सोडले जात आहे. त्यामुळे नदीत जलपर्णी हि वनस्पती संपूर्ण नदीपात्रात पसरली आहे. सदर वनस्पती व सांडपाणी काढणेसाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी शहादा नगर पालिकेकडे अर्ज ,निवेदन दिलेले आहे. नगरपालिकेने तात्पुरता उपाय करुन जलपर्णी काढण्यासाठी सहकार्य केले होते, पंरतु ती तात्पुरती मलमपटटी असते, सांडपाण्याचा व जलपर्णीचा त्रास कायम आहेच, त्यामुळे पिंगाणे गावातील लोकांना मच्छरांचा त्रास मोठया प्रमाणावर सहन करावा लागतो, त्यामुळे नदी किनाऱ्यालगतच्या आदिवासी वस्तीतील लोकाना रात्री झोपणेही कठीण झाले आहे. मार्च महिन्यात डेंग्यु या आजाराचे ३ रुग्ण निघाले होते, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नदी लगतच्या क्षेत्रात बोअरवेल केले असून ते पाणी देखील सांडपाण्याच्या निचऱ्या मुळे अशुध्द झाले आहे, तेच पाणी पिण्यासाठी देखील वापरात घेत असल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्यामुळे गावात आजाराची साथ येवून सामान्य आदिवासी व कष्टकरी लोकांचा जीवाची हानी होण्याची संभावना नाकारता येत नाही.

 

Post a Comment

0 Comments

|