Header Ads Widget


म्हसदी (प्र.नेर)ग्रामपंचायतीचे लाचखोर ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; पन्नास हजारांची लाच भोवली...

 



साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या म्हसदी गावच्या ग्रामपंचायतीचा ग्रामविकास अधिकारी श्री. मेघश्याम बोरसे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतांना अटक केली आहे.तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या वार्डातील उर्दू शाळेमध्ये संरक्षण भिंत, शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक आणि विद्यार्थ्यांसाठी सुलभ शौचालय बांधण्याच्या कामाला मंजुरी मिळण्यासाठी अर्ज केला होता. अनेकदा बोरसे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केल्यानंतरही विकास कामे मंजूर केले जात नव्हते. दरम्यान अंदाजपत्रिकेत 12 लाख रुपये किमतीच्या कामाच्या बदल्यात 20 %टक्क्याप्रमाणे दोन लाख 40 हजार रुपये काम घेणाऱ्या इच्छुक ठेकेदाराकडून आगाऊ कमिशन घेऊन द्यावे लागेल अशी मागणी बोरसे यांनी तक्रारदार यांच्याकडे केली होती.तडजोडीअंती दोन लाख रुपयांमध्ये हा सौदा ठरला होता. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य महिला आणि तिच्या पतीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. याप्रमाणे सापळा रचत आज लाचेचा पहिला हप्ता 50 हजार रुपये स्वीकारत असतांना मेघशाम बोरसे याला म्हसदी ग्रामपंचायत कार्यालयातून रंगेहात अटक करण्यात आली आहे.बोरसे यांच्याविरुद्ध साक्री पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या घटनेमुळे साक्री तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधिक्षक श्री. अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण मोरे, प्रविण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा.शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments

|