Header Ads Widget


तापी काठावरील दोन्ही 'दादा' यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपली भुमिका जाहीर करण्यासाठी प्रेस मारुती मैदानावर आज ता.१९/०४/२०२४ सायंकाळी ०५:०० वाजता कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित ...


अभिजित पाटील (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा)

जयपालसिंह रावल (माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद, नंदुरबार)

प्रतिनिधी /प्रा.गणेश सोनवणे: लोकसभा निवडणुकीच्या बिगुल वाजल्यानंतर अनेकांनी आपल्या सोयीनुसार म्हणा किंवा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव सध्या असलेल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले असले तरी शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल हे तापी काठावरील दोन्ही 'दादा' सध्या तरी 'न्यूट्रल'असल्याने त्यांचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.कार्यकर्त्यांचा आग्रहास्तव आपली भुमिका जाहीर करण्यासाठी दोन्ही युवा नेत्यांनी शहरातील प्रेस मारुती मैदानावर (ता.१९) सायंकाळी पाच वाजता कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे. यंदाचा लोकसभा निवडणूकीत कोणत्या उमेदवाराला मदत करतात. याविषयी जनतेमध्ये उत्सुकता लागली आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुका विशेषता आर्थिक राजधानी म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात प्रत्येक राजकीय पक्षात गटातटाचे राजकारण चालूच असते. हे अनेक वेळा जाहीर कार्यक्रमांमधून निदर्शनास आले आहे. लोकसभेच्या बिगुल वाजल्यानंतर राजकीय नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसह कोणी शिंदे गटात तर कोणी भाजपात दाखल झाले. अर्थात आपल्या राजकीय सोयीनुसार म्हणा किंवा पक्ष कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव विकासाचे व्हिजन या गोंडस नावाखाली प्रवेश केला. शहादा तालुक्यात सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील भाजपात आहेत त्यामुळे स्वतः श्री पाटील व कार्यकर्ते भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील हे सर्वश्रुत आहे. ईतर नेतेही आपापल्याला सोयीनुसार राजकारण करत आहेत.परंतु गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील व जयपालसिंह रावल हे दोन्ही नेते परस्परांचे राजकीय विरोधक असूनही डॉ. हिना गावित यांना निवडून आणण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती हे सर्वश्रुत आहे. गांव परिसर पिंजून काढला होता. २०१९ ला डॉक्टर हिना गावित मोठ्या मताधिक्याने ही निवडून आल्या होत्या. नंदुरबार विधानसभा व लगतचा शिरपूर विधानसभा क्षेत्रात भाजपला मोठे मताधिक्य मिळावे म्हणून दोन्ही नेते पायाला जणू भिंगरी लावून फिरले अन उमेदवाराचा प्रचार केला होता असे कार्यकर्ते सांगतात. आता पुन्हा भाजपने डॉक्टर हिना गावित यांनाच उमेदवारी दिली आहे. व काँग्रेस कडून माजी आदिवासी विकास मंत्री ऍड.के.सी. पाडवी यांचे चिरंजीव ऍड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे दोन्ही दादा आपल्या कार्यकर्त्यांचे मत कोणाच्या पारड्यात टाकायला लावतात याविषयी तालुक्यात उत्सुकता आहे.

दोन्ही दादांची वेल्डिंग......

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल व शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांच्यात परस्परांमध्ये राजकीय मतभेद होते. परंतु २०१९ चा निवडणूकीत डॉक्टर गावित हेच आपले नेते म्हणून दोन्ही दादांनी स्वतंत्ररित्या खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचार करून त्यांच्या पारड्यात आपापल्या कार्यकर्त्यांची मते टाकली. मीच खरा निष्ठावान म्हणून दोघांमध्ये निवडणुकी दरम्यान तू -तू मै -मै ही झाली होती. परंतु कालांतराने नेत्यांकडून फक्त आपला वापरच होतोय. कार्यकर्ते मात्र होरपळले जात आहेत हे लक्षात आल्यानंतर आपसातील वैरभाव मिटवत हे दोन्ही नेते एकत्रित आले. व डॉक्टर गावित परिवाराशी दोघांचे राजकीय फारकत झाली. ते आजतागायत आहे. त्यामुळे यंदाचा निवडणूकीत डॉक्टर हिना गावित यांना मदत करतात की काँग्रेसचे गोवाल पाडवी तथा अन्य कोणाला याविषयी उत्सुकता लागून आहे. शहादा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात व लगतचा शिरपूर भागात या दोन्ही नेत्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे या दोन्ही दादांची भूमिका यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.मेळाव्याची जय्यत तयारी, नागरिकांत उत्सुकता....दरम्यान यंदाचा लोकसभा निवडणुकीत जाहीररित्या सभा घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेणारी पक्षविरहित पहिलीच जाहीर सभा असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता लागली असून मेळाव्याची जय्यत तयारीही सुरु आहे. सभेत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर दोन्ही नेते कोणता निर्णय घेतात याविषयी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात औत्सुक्य निर्माण झाले आहे.१९ तारखेला शहादा येथील प्रेस मारुती मैदानावर कार्यकर्त्यांचा भव्य मेळाव्याचे आयोजन आम्ही केलेले आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठली भूमिका घेतली पाहिजे 

आपण काय केलं पाहिजे, कुठल्या दिशेने गेले पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय इच्छा आहे. विकास कामांमध्ये आणि पुढच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे ते ठरवण्यासाठी आम्ही मेळाव्याचे आयोजन केले आहे. शेवटी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जनताच मालक असते जनतेच्या विरुद्ध कुठला नेता गेला तर त्याचे परिणाम भोगावे लागतात म्हणून जनतेची इच्छा जाणून घेण्यासाठी जनतेचे इच्छेनुसार पुढचं पाऊल उचलण्यासाठी कार्यकर्ते आणि जनता जे सांगेल तेच आम्ही करणार आहोत. यामध्ये कुठल्याही पक्षाचा कुठलाही नेत्याचा आमचा काही संबंध नाही.मेळाव्याला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे".----जयपालसिंह रावल (माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद, नंदुरबार.
"सामाजिक, राजकीय जीवनात वावरत असताना अनेक सहकार्यांनी, अनेक कार्यकर्त्यांनी मागच्या अनेक वर्षापासून आम्हाला साथ दिलेली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या समर्थकांची काय भूमिका असली पाहिजे त्यासाठी शहरातील प्रेस मारुती मैदानावर सायंकाळी पाच वाजता विचार मंथन बैठक आयोजित केली आहे. सभेला मार्गदर्शक मुन्ना दादा देखील उपस्थित राहणार आहेत.आजपर्यंत आम्हाला लोकांनी जे सांगितले आहे त्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची सभा आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तसेच लगतचा परिसरातील सर्व समर्थक बंधूंना, मतदारांना विनंती आपण मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे----अभिजित पाटील (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा)

Post a Comment

0 Comments

|