Header Ads Widget


वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे...

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा.गणेश सोनवणे 

शहादा शहरातील मेन रोडसह विविध भागात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिक व वाहनधारकांत वाहतूक कोंडीवरून तू-तू-मै-मै नित्याचीच झाली असून छोट्या मोठ्या कारणांवरून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होऊ शकतो.यासाठी पालिका व पोलिसांनी संयुक्त पणे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहादा शहरातील दोंडाईचा रोड, जुना मोहिदा रोड, डोंगरगाव रोड, जुना प्रकाशा रोड, मेन रोड, भगवा चौक,खेतीया रोडसह बस स्थानक व नगरपालिका परिसरात चौकात सतत वाहतुकीची कोंडी होत असते. दिवसभरातून या भागात रस्त्याने ये-जा करणारे नागरिक, संबंधित व्यावसायिक व वाहनधारक यांच्यात वाहन पार्किंग वरून भानगड होत असते. अनेकदा प्रकरण हमरीतुमरी वर येते. पालिका व पोलीस प्रशासनाने या परिसरातील रहदारीचे नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. वाहतूक कोंडीतून शहरात मोठा अनर्थ होण्याच्या धोका संभवू शकतो. यातून कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. जुना मोहिदा रोड व डोंगरगाव रस्त्यालगत लाॅरीधारक तसेच अन्य व्यावसायिक भर रस्त्यालगत व्यवसाय करत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी तसेच शांततेचा भंग होऊ नये यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याची अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्त केली जात आहे.हम रस्त्यावर चारचाकी.....शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे.ग्रामीण भागातून तसेच शहरातून बाजारात येणारे नागरिक मुख्य रस्त्यावर आपले चार चाकी वाहन पार्किंग करून बाजारात जातात.यावेळी वाहतूक कोंडी होते तसेच व्यावसायिकांच्या दुकानासमोर वाहन लावल्याने संबंधित दुकानावर येणाऱ्या गिर्‍हाईकाचे वाहन लावण्यास जागा नसल्याने त्या ठिकाणी आरडाओरड सुरू होते. अशावेळी वाहनधारकांनी शिस्त बाळगल्यास वाहतूक कोंडी होणार नाही.

Post a Comment

0 Comments

|