नंदुरबार/प्रतिनिधी
भारताच्या निवडणूक आयोगाने देशभरात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालयातील, सार्वजनिक मालमत्तेवरील व खाजगी मालमत्तेवरील प्रचार व प्रसिद्धीच्या साहित्याचे प्रदर्शन व प्रसारण थांबवण्याचे व अशा प्रकारची सामग्री काढून टाकण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिल्या आहेत.
ते काल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आदर्श आचारसंहितेसंदर्भात आयोजित विविध कार्यान्वयीन यंत्रणांच्या बैठकीत बोलत होते. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महानुनी (नंदुरबार), नतिशा माथूर (तळोदा), उपजिल्हा निवडणूक अधिकारी, प्रमोद भामरे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता श्रीमती मनीषा कोठारी, सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. गोगटे म्हणाले, आजपासून पहिल्या 24 तासात सर्व शासकीय कार्यालयातील सर्व प्रचार प्रसिद्धीचे साहित्य, बॅनर्स, होर्डिंग्ज, काढण्यात यावेत. कोनशिला झाकण्यात याव्यात. पुढच्या 48 तासात सार्वजनिक मालमत्तांवरील प्रचार प्रसिद्धीचे साहित्य काढण्यात यावे. पुढील 72 तासात खाजगी मालमत्ता यावरील सर्व प्रचार प्रसिद्धीचे साहित्य काढण्यात यावे, याची जबाबदारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आहे. तसा अहवाल अनुक्रमे 24, 48 व 72 तासात सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपआपल्या मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करावा. ज्या विभागांचे प्रचार रथ सुरू असतील त्यांनी ते तात्काळ बंद करावेत. 72 तासानंतर सर्व अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी सर्व प्रसार प्रसिद्धीचे साहित्य काढल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच संकेतस्थळावरील मंत्र्यांची छायाचित्रे काढुन शासकीय विश्रामगृहाचा वापरही बंद करण्यात यावा. विविध विकास कामे सुरु असलेल्या कार्यान्वयीन यंत्रणांनी सुरु असलेल्या कामांची यादी आवक, जावक नोंदवहीच्या पानाच्या झेरॉक्स प्रतीसह निवडणूक विभागाला सादर करावी. सादर करावी.ते पुढे म्हणाले, निवडणूकीच्या कामात आपल्यास्तरावर हलगर्जी होणार नाही याची सर्व संबंधितांनी काळजी घ्यावी. सर्व यंत्रणांना 24, 48 व 72 तासाचा प्रोटोकॉल आहे. त्यानुसार सर्व संबंधितांनी त्वरीत कार्यवाही करावी. आदर्श आचारसंहितेचा काटेकोर पालन होईल याची दक्षाता घ्यावी. आपल्या भागात आचारसंहितेचा भंग झाल्यास थेट कार्यवाही होणार त्यामुळे सर्व संबंधितांनी काळजीपूर्वक आपले कर्तव्य पार पाडावे. वीज वितरण कंपनीच्या खांबांवरील प्रचार प्रसिद्धीचे साहित्य त्वरीत हटवावे. यापुढे कोणतेही उद्घाटन, भुमिपुजन कार्यक्रम घेता येणार नाहीत. तसेच निवडणूक कालावधीत सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या मुख्यालयात थांबावे, असेही यावेळी श्री. गोगटे यांनी सांगितले.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक प्रमोद भामरे या निवडणूकीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 01-अक्कलकुवा मतदार संघासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी नतिशा माथूर, 02-शहादा मतदार संघासाठी उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, 03- नंदुरबार मतदार संघासाठी उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी व 04-नवापूर मतदार संघासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे यांनी सांगितले.
0 Comments