Header Ads Widget


दरा ते कामोद पर्यंत शेकडो एकर डोंगरावरील वृक्षांना दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने शेकडो वृक्ष होरपळले...


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे सातपुडा पर्वत रांगेतील दरा ते कामोद पर्यंत शेकडो एकर डोंगरावरील वृक्षांना दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने शेकडो वृक्ष होरपळले.दिवसेंदिवस वनसंपदा नष्ट होत आहे. वणवे टाळण्यासाठी वन विभागाने डोंगर परिसरातील लोकांच्या जनजागृतीची मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. वणवे रोखण्यासाठी स्थानिक मंडळांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सातपुडा पर्वत रांगेत मोठ्या प्रमाणात जंगले नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. अनेकवेळा लहान मोठ्या आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. यात हिरवाईने नटलेले वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी होऊन नामशेष होतात. परिणामी सातपुडा उघडा बोडका होत चालला आहे. दरवर्षी वन विभाग, सामाजिक संस्था,स्थानिक गावकरी यांच्या माध्यमातून हजारो वृक्षांची लागवड करण्यात येते.लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने केलेल्या कृत्याबद्दल वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. सातपुडा पर्वत रांगेतील डोंगरकपारीतील वने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यावर उपाय करण्याची वेळ आली आहे. अज्ञात माथेफिरुने लावलेल्या या आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी प्राणी, त्यांची अंडी, घरटी जळून खाक , झालेही असतील.अंडी व घरटी जळाल्याने अनेक पक्षी त्या आगीत प्राणाची आहुती देतात. याबाबत जनजागृती चळवळ उभारण्याची गरज आहे. डोंगरावर पावसाळ्यात गवत चांगले यावे, म्हणून आगी लावले जातात असे काही नागरिक सांगतात. काही जण सहज जाताजाता विडी, सिगारेट पेटवून टाकतात. त्यामुळे आगी लागतात. काही जण केवळ हौस म्हणून आग लावतात, तर काही जण शेतातील पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावतात. तीच आग आटोक्‍यात न आल्यास इतर ठिकाणी आगी लागतात. वनातील अथवा वनालगतच्या शेतातील झाडांवर असणारे मधमाश्‍यांचे पोळे काढण्यासाठीही आग लावली जाते.

Post a Comment

0 Comments

|