नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे
शहादा तालुका एज्युकेशनल सोसायटी आणि को-ऑप. एज्युकेशनल सोसायटी लिमिटेड शहादा संचलित, आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई संलग्नित, ‘सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालय, शहादा येथे विद्यार्थी विकास विभागातर्फे विविध ‘डे’ साजरा करण्यात आले.
दिनांक १४ ते १६ मार्च या तीन दिवसीय कालावधीत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले होते. पहिल्या दिवशी ‘ग्रुप डे' आणि 'चॉकलेट डे ’ साजरा करण्यात आला. या दिवशी बी.ए. आणि बी.सी.ए वर्गातील विद्यार्थिनींचे दोन ग्रुप तयार करून अनुक्रमे काळा व पांढरा टी-शर्ट परिधान करून या दिवशी कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. त्याचबरोबर आपल्या मैत्रिणी आणि प्राध्यापकांना चॉकलेट देऊन ‘चॉकलेट डे’ साजरा करण्यात आला. तसेच ग्रुप नुसार गाणे-संगीत खुर्ची आणि इतर अनेक खेळ खेळून हा दिवस विद्यार्थिनींनी साजरा केला.
दुसऱ्या दिवशी ‘मिसमॅच' आणि 'सिग्निचर डे’ साजरा करण्यात आला. वेगवेगळ्या चित्र-विचित्र वेशभूषा आणि रंगभूषा करून या दिवशी विद्यार्थिनींनी 'मिसमॅच डे' साजरा केला. या दिवशी टी-शर्ट, रुमाल व हातावर आपल्या मैत्रिणींच्या सह्या घेऊन त्यांना संग्रहित ठेवण्याचा मानस विद्यार्थिनींनी व्यक्त केला.
तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.जे.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘ट्रॅडिशनल आणि बॉलीवूड डे’ साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आला. ‘भारतीय लोकधारा’ या थीमनुसार भारतातील विविध राज्यातील पारंपरिक वेशभूषा परिधान करून या दिवशी विद्यार्थिनी महाविद्यालयात उपस्थित होत्या. या दिवशी बॉलीवूडमधील विविध नट आणि नट्यांची वेशभूषा करून विद्यार्थिनी महाविद्यालयात सिने तारका बनून आल्या होत्या. बॉलीवूडमधील प्रसिध्द जोड्यांची झलकही या दिवशी बघायला मिळाली.
वेशभूषेनुसार नक्कल, नृत्य, विनोद, गाणी गायली गेली. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, राजस्थान, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, आसाम, बंगाल इत्यादी राज्यांतील पारंपरिक वेशभूषा, केशभूषा, अलंकारांचे दर्शन या दिवशी घडले. ज्या राज्यातील वेशभूषा परिधान केली असेल त्या राज्याविषयी थोडक्यात माहिती, तिथले पारंपरिक नृत्य - गाणे विद्यार्थिनींनी सादर केले. यामध्ये कल्याणी मोरे, चेतना पाटील, आम्रपाली मोरे, सेजल बडगुजर, राजेश्री ठाकरे, वैभवी पाटील, वृषाली गायकवाड, निकिता राजपूत, हिमांगी चौधरी, ख़ुशी कुलकर्णी, पायल पाटील, दिपाली ठाकरे या विद्यार्थिनींचा समावेश होता. या विविध सांस्कृतिक कार्यक्रमानंतर समूह नृत्य करून तीन दिवसीय कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास अधिकारी सहा.प्रा.खेमराज पाटील आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी केले. महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापकांचे विशेष सहकार्य कार्यक्रमासाठी होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.संजना पाटील आणि भावना पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन सहा.प्रा.खेमराज पाटील यांनी केले.
0 Comments