Header Ads Widget


समृद्ध भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता राष्ट्रीय शिक्षण धोरणात ; डॉ. जगदीश पाटील.

 



साक्री प्रतिनिधी/ अकिल शहा 


समृद्ध भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता राष्ट्रीय शिक्षण धोरणात आहे.या धोरणाच्या अंमलबजावणीतून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य गुणांची वृद्धी करून कुटुंबाप्रती,समाजाप्रती व राष्ट्राप्रतीच्या कर्तव्यपूर्तीची जाणीव निर्माण करण्याचे कार्य केले जाणार आहे असे मत कबचौ उमवि,जळगाव येथील मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ जगदीश पाटील यांनी व्यक्त केले.

                 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आय.क्यू.ए.सी. व विद्या विकास मंडळाचे सिताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री च्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने " नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020: थीम अँड प्रोस्पेक्टस्" या विषयावर प्राध्यापकांसाठी आयोजित एक दिवशीय चर्चासत्रात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन कबचौ उमवि जळगाव व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे होते. प्रसंगी प्राचार्य डॉ. एस.पी.गिरासे, प्राचार्य डॉ. के.डी.कदम, प्राचार्य डॉ.सुधाकर जाधव, प्राचार्य डॉ.एस.सी.अहिरे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील उपस्थित होते.

             उद्घाटकीय मनोगतात डॉ.शिवाजी पाटील बोलताना म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा समावेश असून, रोजगारक्षम शिक्षणाची निर्मिती या धोरणातून राबविली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार असून विद्यार्थी,पालक व शिक्षकांना सदर धोरणाविषयी उद्बोधन करण्याच्या दृष्टिकोनातून सदर परिसंवाद महत्त्वाचा असल्याचे मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले. डॉ.जगदीश पाटील यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी सविस्तर माहिती दिली. बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीत देखील बदल होणे गरजेचे असून समाजाचा पाया ज्ञान असला पाहिजे या उद्देशाचा समावेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.शिक्षण पद्धतीत समाजाचा सहभाग, स्थानिक विविधतेचा व संस्कृतीचा सन्मान, तंत्रज्ञानाचा वापर,संकल्पनात्मक समज, विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण ज्ञान,कौशल्यपूर्ण शिक्षण इत्यादी विविध प्रमुख तत्त्वांचा अवलंब राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केला असल्याचे मत देखील त्यांनी प्रसंगी व्यक्त केले.

                   अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात आश्वासक बदल घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. अध्ययन व अध्यापन पद्धतीत होणाऱ्या नाविन्यपूर्ण बदलाचा सर्व घटकांनी सकारात्मकपणे स्वीकार करून त्यात सहभागी व्हावे असे देखील मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे आय क्यू ए सी समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ प्रीतम तोरवणे यांनी तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ अनंत पाटील यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा योगेश आहेर यांनी केला. सदर चर्चासत्रात साक्री तालुक्यातील पिंपळनेर, दहिवेल, निजामपूर, म्हसदी, साक्री तसेच कुसुंबा येथील महाविद्यालयातील एकूण ११५ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. सदर चर्चासत्र यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments

|