Header Ads Widget


नवापूर तालुक्यातील नावली येथील घटना; रेशनसाठी महिलांचा एल्गार, पुरवठा अधिकाऱ्याला चक्क कोंडले!

नंदुरबार/प्रतिनिधी : नवापूर तालुक्यातील नावली गावात रेशन मिळत नसल्याने लाभार्थी महिलांनी स्वतः सह तपासणीसाठी आलेल्या पुरवठा अधिकाऱ्याला गावातील सभागृहात कोंडून घेतले. रेशन दुकानदाराने पूर्ण रेशन देण्याची मागणी करत, महिलांनी हे आंदोलन केले.

नावली येथील शिधापत्रिकाधारकांना योग्य प्रमाणात रेशन वाटप होत नसल्याची तक्रार सातत्याने करण्यात येत होती. यातून महिला आणि पुरुष लाभार्थीनी वेळोवेळी तहसीलदारांकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल घेत, बुधवारी तालुका पुरवठा अधिकारी दिलीप पाडवी हे लाभार्थीच्या रेशन कार्डाची तपासणी करण्यासाठी नावली येथे गेले होते. या ठिकाणी गावातील सभागृहात प्रत्येक लाभार्थीची तपासणी करत असताना, शिधापत्रिकाधारक महिलांकडून त्यांना प्रश्न विचारण्यात येत होते, परंतु पुरवठा अधिकारी पाडवी

सभागृहाला कुलूप लावल्यानंतर बाहेर थांबलेली लाभार्थी महिला.

यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. संबंधित रेशन दुकानदाराला सभागृहात बोलावण्याची मागणी महिलांची होती, परंतु रेशन दुकानदार हजर झाला नव्हता, यातून संतप्त झालेल्या महिलांनी स्वतः सह पुरवठा अधिकाऱ्याला सभागृहात कोंडून घेतले. या प्रकारानंतर भांबवलेल्या प्रशासनाने महिलांची समजूत काढल्यानंतर तब्बल तीन तासांनंतर पुरवठा निरीक्षक दिलीप पाडवी यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले.

Post a Comment

0 Comments

|