नंदुरबार /प्रतिनिधी
नंदुरबार घरगुती वापराच्या गॅस सिलींडरचा काळा बाजार करुन वाहनांमध्ये भरतांना एकाला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ६० हजार ५०० रुपये किंमतीचे ५ सिलींडरसह एक गॅस भरण्याची मोटार व वजनकाटा मिळून आला आहे. ही कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. याप्रकरणी एकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील एक इसम घरगुती वापराचे गॅस सिलींडर वाहनांमध्ये भरुन काळा बाजार करीत असल्याची माहिती नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने संत - कबिरदास प्राथमिक शाळेच्या बाजूला असलेल्या गल्लीतील मोकळ्या जागेत पाहिले असता एक इसम वाहनांमध्ये गॅस भरतांना दिसून आला. पोलिसांनी छापा टाकून त्यास ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता अब्दुल खलील अब्दुल हक पिंजारी (रा. शास्त्री मार्केट, नंदुरबार) असे त्याने नाव सांगितले. त्याच्याकडून ३० हजार रुपये किंमतीची एक लोखंडी स्टॅण्डवर १.५ एचपी क्षमतेची गॅस भरण्याची मोटार, ८ हजार रुपये किंमतीचा वजन काटा, २२ हजार ५०० रुपये किंमतीचे ५ गॅस सिलींडर असा एकुण ६० हजार ५०० रुपये किंमतीचे गॅस सिलींडरसह साहित्य मिळून आले आहे. याबाबत पोशि. अभय शशीकांत राजपूत यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्दुल खालील अब्दुलहक पिंजारी याच्याविरुद्ध भादंवि कलम २८५, २८६, ३३६ सह अत्यावश्यक वस्तू अधिनिमय कलम ३ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे, पोना. राकेश मोरे, मोहन ढमढेरे, पोशि. आनंदा मराठे, अभय राजपूत यांच्या पथकाने केली.
0 Comments