नंदुरबार /प्रतिनिधी
नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सन २००७ पूर्वी नोंदणी झालेली वाहने व ड्रायव्हींग लायसन्स यांच्या हस्तलिखीत अभिलेखाचे संगणकीकरण करण्याचे कामकाज सुरु आहे. वाहन व लायसन्सचा अभिलेख संगणकीय प्रणालीवर उपलब्ध झाल्यावर आता ऑनलाईन व फेसलेस सुविधांचा लाभ वाहनधारकांना घेता येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस पत्रक देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यालयीन अभिलेखाचे संगणकीकरण सुरु आहे. आता कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहता ड्रायव्हींग लायसन्सचे नुतनीकरण, दुय्यम प्रत, वाहनांचा कर भरणार, वाहन हस्तांतरण व अन्य सेवा वाहनधारकांना उपलब्ध होतील. वाहनाचे मुळ नोंदणी प्रमाणपत्र, आधारकार्ड, विमा, चेचीस क्रमांक पेन्सील प्रिंट, मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रे कार्यालयीन अधिक्षक यांच्याकडे जमा करुन वाहन अभिलेखाचे संगणकीकरण करुन घ्यावे तसेच २००७ पूर्वीच्या अनुज्ञप्तीधारकांनी हस्तलिखीत स्वरुपाचे ड्रायव्हींग लायसन्स, आधारकार्ड, मोबाईल आदींसाठी लायसन्स विभागात संपर्क करावा.
सदरची सेवा पूर्णतः निशुल्क असून २००७ नंतरचा अभिलेख संगणकीय स्वरुपात असल्यामुळे २००७ नंतर वाहनांची नोंदणी झाली असेल किंवा २००७ नंतरचे स्मार्ट कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स असेल अशा वाहनधारकांनी कार्यालयाशी संपर्क करण्याची आवश्यकता नाही, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी कळविले आहे.
0 Comments