नंदुरबार/प्रतिनिधी
जिल्ह्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियान 4.0 ची कामे अभियान स्वरूपात राबवावीत. ही कामे मार्च अखेर पूर्ण करून गावे हागणदारी मुक्त अधिक करावीत. या कामात दिरंगाई व टाळाटाळ करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला.
नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या याहा मोगी सभागृहात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपायुक्त (विकास )मनोजकुमार चौधर, उपायुक्त डॉ.राणी चाटे उपायुक्त सोनवणे,प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा )आर. एन.गावडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जयवंत उगले, जनजीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम.डी.धस आदी उपस्थित होते.
बैठकीत जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपट्टीचे महत्व ग्रामस्थांमध्ये पटवून देनेसाठी व पाणीपट्टी बाबत जाणीव जागृती करण्यासाठी छपाई करण्यात आलेल्या टी-शर्ट व कॅपचे विमोचन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. आढावा बैठकीत विभागीय आयुक्त गमे यांनी विकसित संकल्प भारत यात्रा,स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम व प्रोत्साहनपर बक्षीस वितरण, सार्वजनिक शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व्यवस्थापन,कामांचा आढावा घेतला.या कामाची प्रगती वाढवून नंदुरबार जिल्हा मार्च अखेर हागणदारी मुक्त अधिक घोषित करून जिल्हा प्लास्टिक मुक्त घोषित करावा. यासाठी सर्व विभाग प्रमुख व ग्रामसेवक यांनी संघटितपणे कामे करावीत. ग्रामसेवक यांच्या कामकाजाबाबत डॅशबोर्ड च्या माध्यमातून नियमित आढावा घेण्यात यावा.तसेच मोदी आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजनेअंतर्गत अपूर्ण असलेली घरकुले तात्काळ पूर्ण करावेत. यासाठी गाव किंवा गट स्तरावर लाभार्थ्यांची शिबिरे घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे.तसेच पूर्ण केलेल्या घरकुलांना तात्काळ अनुदान वर्ग होईल यासाठी नियोजन करण्यात यावे अशा सूचनाही विभागीय आयुक्त गमे यांनी यावेळी केल्या.
जल जीवन मिशन अंतर्गत कामांची गतीही संथ सुरु आहे. पाणीपुरवठा योजनांची सुरू असलेली कामे त्वरित पूर्ण करून शंभर टक्के कुटुंबांना नियमित व शुद्ध तसेच पुरेसे पाणी मिळेल यासाठी नियोजन करण्यात यावे. दुर्गम भागातील मंजूर सोलर वर आधारित पाणी पुरवठा योजनांची कामे महिना अखेर पूर्ण करण्यात यावीत. जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विकास विभाग यांनी संयुक्तपणे नियोजन करावे.कुपोषित बालकांची स्क्रीनिंग वेळेवर करण्यात यावी. जास्तीत जास्त महिलांची प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात होतील यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या.
माझी वसुंधरा अभियानात जिल्ह्याची कामगिरी असमाधानकारक असून गटविकास अधिकारी यांनी विशेष लक्ष पुरवावे. पंधरावा वित्त आयोगांचा खर्च वाढवावा, दुर्गम भागातील स्थलांतर थांबविण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त कामे ग्रामस्थांना उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचनाही यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केल्या.बैठकीस सर्व विभाग प्रमुख,गटविकास अधिकारी उपस्थित होते.जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपट्टी वसुलीबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी छपाई करण्यात आलेल्या टी-शर्ट व टोपीचे विमोचन करताना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे. समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार आदी.
0 Comments