Header Ads Widget


नंदुरबार येथील जल जीवन मिशन अंतर्गत कार्यशाळा संपन्न


नंदुरबार (प्रतिनिधी ) उद्याच्या विकसित व सुदृढ भारत निर्माण करायचा असेल तर गावात सरपंच ग्रामसेवक यांना हातात हात घालून कामे करावी लागणार आहेत.पाणी व स्वच्छतेच्या बाबतीत गावे स्वयंपूर्ण झाल्यास खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारतातील महात्मा गांधी यांनी पाहिलेले स्वयंपूर्ण खेड्यांचा भारत  अस्तित्वात येइल.यासाठी गावातील प्रत्येक योजनांची प्रभावीपणे लोकसहभागातून अंमलबजावणी करावी असे आव्हान उद्धव फड यांनी केले.


नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी करणे करिता जिल्हास्तरीय  कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषदेचे अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गावित यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, प्रकल्प संचालक एम.डी.धस ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जयवंत उगले ,मार्गदर्शक उद्धव फड, शहादा पंचायत समितिचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे ,तळोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी , आक्रणीचे गट विकास अधिकारी सि.टी. गोस्वामी उपस्थित होते.


कार्यशाळेत उपस्थिताना मार्गदर्शन करताना  लातूर येथील मार्गदर्शक उद्धव फड म्हणाले की, महात्मा गांधी, संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज आदी महापुरुषांनी भविष्यात निर्माण होणारा पाण्याचा तुटवडा ओळखून पाणी वाचवण्याच्या उपदेश त्याकाळी केला आहे. अनेक संस्थांच्याअहवालानुसार सन 2050 पर्यंत पाच माणसांमागे एक माणसाला पिण्याचे पाणी मिळणार नाही. यामुळे पाणी योजनांचे प्रत्येक गावात योग्य नियोजन करणे काळाची गरज आहे.प्रत्येक ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्रआल्यास गावाचा विकास शक्य आहे.असे केल्यास प्रत्येक गाव आदर्श होतील.यातून उद्याच्या भारत निर्माण होईल. असे झाल्यास संत तुकडोजी महाराज यांच्या माझे गावच नाही का तीर्थ  या उक्तीप्रमाणे गावे आदर्श होतील.यासाठी गावात झालेल्या प्रत्येक शासनाच्या योजनेची प्रभावी व अंमलबजावणी झाल्यास प्रत्येक ग्रामपंचायतीत सरपंच ग्रामसेवक यांचे फोटो लावले जातील.

यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित म्हणाल्या की गावात पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करताना पुढील 30 वर्षाचे नियोजन करून योजनेची आखणी करण्यात आली आहे.जल जीवन मिशन अंतर्गत प्रति व्यक्तीला प्रतिदिन 55 लिटर याप्रमाणे शुद्ध व नियमित पाणी मिळेल यासाठी गावात सुरू असलेल्या योजनांची तांत्रिकदृष्ट्या योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

याप्रसंगी उपस्थित सरपंच ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार म्हणाले की,जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे जिल्ह्यात सुरू आहेत.मानवी निर्देशांकानुसार सर्वांना शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे  यामुळेच सद्यस्थितीत देशात पाणी व स्वच्छता या घटकांवर मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. या कामात लोकांचा सहभाग  महत्त्वाचा आहे.शुद्ध पाणी व स्वच्छता नसली तर आरोग्याची समस्या निर्मान होईल अशी समस्या निर्माण झाल्यास ही सामूहिक जबाबदारी राहणार आहे.पाणीपुरवठा योजना करून फायदा नाही. त्यासाठी योजनांची देखभाल दुरुस्ती नियमित होणे गरजेचे आहे. योजना शाश्वत राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखून आपला आर्थिक,श्रमिक लोकसहभाग नोंदविणे आवश्यक आहे.तसेच गावातील शाश्वत स्वच्छतेसाठी गावातील सांडपाणी,घनकचरा व प्लास्टिक यांचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रमोद कुमारपवार यांनी यावेळी केले.

कार्यशालेस सर्व ग्रामपंचायतिचे सरपंच , विस्तार अधिकारी (पंचायत) उपअभियंता ,शाखा अभियंता, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, जिल्हा कक्षातील कर्मचारी ,गट समन्वयक, आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम.डी. धस यांनी केले. सूत्रसंचालन  व आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनील पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|