Header Ads Widget


मोलगी येथे अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी मिळणार - विधान परिषद आमदार आमश्या पाडवी


प्रतिनिधी | अक्कलकुवा

       सातपुड्याच्या जनतेला शासकीय कामासाठी अक्कलकुवा येथे यावे जावे लागते त्यामुळे गरीब जनतेला आर्थिक भुर्दंडा सह वेळेचा ही अपव्यय होत असल्याने अनेक वर्षा पासुन मोलगी तालुक्याच्या निर्मितीची मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे तूर्त जनतेचा त्रास कमी व्हावा यासाठी लवकरच  मोलगी येथे अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी मिळणार असल्याची माहिती आ.आमश्या पाडवी यांनी दिली यासाठी आमदार आमश्या पाडवी हे पाठपुरावा करीत आहेत.
      अक्कलकुवा तालुका हा सातपुड्याच्या कुशीतील १०० टक्के अतिदुर्गम भागातील तालुका म्हणुन सर्व दुर परिचित आहे. या तालुक्यातील प्रथम क्रमांकाचे मणिबेली गाव ते अक्कलकुवा या तालुक्याच्या गावाच्या ठिकाणाचे एका बाजूचे अंतर सुमारे ७० किमी पेक्षा जास्त आहे. तर अक्कलकुवा तालुक्याची लोकसंख्या ही २०११ च्या जनगणनेनुसार २४५८६१ इतकी आहे. अतिदुर्गम व डोंगराळ भाग असलेल्या या तालुक्याची भौगोलिक संरचना पाहता नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर व परिसरात वसलेली गावे विकासाच्या प्रवाहा पासुन कोसो दुर आहेत. सदर ठिकाणी पुरवठा, रोजगार हमी योजना, नैसर्गिक आपत्ती,विकासाची कामे, देखरेख व संनियंत्रित  विषयक कामे करतांना प्रशासनास अपयशाला सामोरे जावे लागत असल्याचे अनेकदा पुढे आले आहे. दुर्गम व डोंगराळ भागात वास्तव्य करणाऱ्या  नागरिकांना देखील शासन व प्रशासन स्तरावर याबाबत माहिती देणे अथवा म्हणणे मांडायला तालुक्याच्या ठिकाणी ये जा करणे करीता आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे याकरीता मोलगीला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी बऱ्याच वर्षापासून पुढे येत होती. याचाच एक भाग म्हणून मोलगी येथे अप्पर तहसील कार्यालय निर्मिती व्हावी या हेतूने प्रशासन कार्य करीत आहे. या करीता दि. १०/०४/२०२३ रोजी  जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे रितसर प्रस्ताव सादर केला आहे. परंतु त्यास अपेक्षित यश प्राप्त होत नव्हते. ही बाब विधानपरिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ याबाबत मंत्रालयात अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांची भेट घेऊन मोलगी येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी देण्याची मागणी केली. तसेच मोलगी येथे कार्यालय स्थापन झाल्यास तालुक्यातील एकूण १९४ गावांपैकी सातपुड्याच्या कुशीतील ८४ गावातील सुमारे १०३२४७ नागरिकांना मोलगी येथेच सर्व शासकीय सुविधा उपलब्ध होतील हे पटवुन दिले.या पूर्वीच मोलगी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कार्यालय, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय जमाना, सहा. पोलीस निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली पोलीस ठाणे, शासकीय धान्य गोदाम, सब पोस्ट ऑफिस इत्यादी महत्वाची कार्यालय उपलब्ध आहेत जी प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाशी जोडली जाऊ शकतात. आदी बाबी महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिल्या. सदर बाब ही जनहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने नागरिकांच्या संवेदना जाणुन सदरच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी प्रदान करण्याच्या हेतूने कार्यवाही केली जाईल असे आश्वासन अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांनी दिले आहे अशी माहिती आमदार आमश्या पाडवी यांनी दिली आहे. मोलगी येथे अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्मिती नंतर मोलगी तालुक्याच्या निर्मितीचे ध्येय असल्याचे ही आमदार आमश्या पाडवी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

|