Header Ads Widget


विसरवाडीत दरोडा टाकणाऱ्या नवापूरातील दोघांसह ५ नेपाळी जेरबंद...



नंदुरबार /प्रतिनिधी 

 व्यापाऱ्याच्या घरी दरोडा टाकणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला अवघ्या काही तासातच जेरबंद करण्यात आले आहे. या ७ जणांच्या टोळीत नवापूर तालुक्यातील दोघांसह नेपाळमधील ५ नेपाळी संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कामगिरी नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व विसरवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.

नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील कुंभार गल्लीत राहणारे भरत उर्फ मुन्ना गणेश अग्रवाल या व्यापाऱ्याच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास ५ दरोडेखोरांनी प्रवेश करुन सशस्त्र दरोडा टाकला. भरत अग्रवाल व त्यांची पत्नी सोनाली अग्रवाल यांचे हातपाय व तोंड बांधून लोखंडी टॅमीने मारहाण करीत विळ्याचा धाक दाखविला. बेडरुमधील कपाटातून दोन लाख ६ हजार २५० रुपये किंमतीचे दागिने व रोकड चोरुन नेण्यात आली. या दरोड्यावेळी घरात झोपलेल्या दिशा भरत अग्रवाल या मुलीच्या सतर्कतेने तीने काका यांच्या मार्फत पोलिसांना माहिती दिली. विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता दरोडेखोर व पोलिसांमध्ये झटापट झाली. या झटापटीत पोलिसांनी दोघांना पकडले तर पळ काढणाऱ्या दोघांना पाठलाग करीत ताब्यात घेतले. तर एक दरोडेखोर पसार झाला होता. चारही दरोडेखोरांना पोलिस ठाण्यात आणून विचारपूस करीत गुन्ह्यातील सहभागी संशयीतांची नावे निष्पन्न केली. विसरवाडी पोलिस ठाणे व नंदुरबार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकांनी पळालेल्या संशयीताला सुरत रेल्वेस्थानकातून ताब्यात घेतले. पाचही दरोडेखोर हे नेपाळ देशातील असल्याने या दरोड्याच्या घटनेचा अधिकच संशय बळावला. पाचही संशयीतांची अधिकची चौकशी केली असता नेपाळ मधील दरोडा टाकणाऱ्या टोळीने नवापूर तालुक्यातील दोन स्थानिकांच्या मदतीने दरोडा टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. योहान जेनू गावित (वय ३८, रा. अंठीपाडा, ता. नवापूर), याने नेपाळमधील पाचही दरोडेखोरांना विसरवाडीत दरोडा टाकल्यावर जास्तीचे पैसे मिळतील असे अमिष दाखविले. तसेच भाईदास साकऱ्या गावित (वय ३४, रा. बळीफळी नांदवण, ता. नवापूर) या संशयीतामार्फत नेपाळमधून दरोडेखोरांना बोलवून सविस्तर माहिती दिली. म्हणून नवापूर तालुक्यातील दोन स्थानिकांच्या मदतीने नेपाळमधील ५ नेपाळींनी विसरवाडीत दरोडा टाकल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी चक्र मिनराम सुनार उर्फ चेतन बहादूर सोनी (वय २९, रा. तातापाणी, ता. पंच्चूपूरी, जि. सुरखेत, नेपाळ, ह. मु. टिकापूर नेपाळ), हिक्करमल ऊर्फ हिमंत जनक शाही (वय- २८ रा. सिरखानाता राजकोट जि. कालीकोट नेपाळ), भरत धरमराज सोनी (सोनार, वय २१ रा. मोहन्याल जि.कैलानी नेपाळ), राजु केरे विश्वकर्मा (वय- ३६ रा. सोडपाणी ता. सुखल जि. कैलानी नेपाळ), भाईदास साकऱ्या गावीत (वय ३४ रा. बडीफळी नांदवन ता. नवापुर जि. नंदुरबार), योहान जेनु गावीत (वय ३८ रा. आंटीपाडा ता. नवापुर जि. नंदुरबार), तुफान ऊर्फ तप्त बहादुरदिनेशसिंग ऊर्फ दिनेश रावत (वय ३१ रा. थाकालीपूर पोस्टे लम्की जि. कैलाली नेपाळ, ह.मु. कुरुभु रहाली, जैसी नगर, बँगलोर कर्नाटक) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत भरत ऊर्फ मुन्ना गणेश अग्रवाल विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ७ दरोडेखोरांविरुद्ध भादंवि कलम ३९५, ३९७,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील यांचेसह स्थानिक गुन्हे शाखा व विसरवाडी पोलीस ठाण्याच्या पथकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

|