Header Ads Widget


विसरवाडीत मध्यरात्री व्यापाऱ्याच्या घरी डल्ला;मुलगी व नागरीकांच्या धाडसाने पाच चोरटे पोलिसांच्या ताब्यात

 






नवापूर/ प्रतिनिधी 

विसरवाडी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दरोडा टाकून घरातील पती-पत्नीचे हातपाय दोरीने बांधून ऐवज लांबवित होते. आई-वडीलांची आरोळी ऐकून झोपलेली मुलगी जागी झाल्याने तिने हा प्रकार पाहिल्यानंतर गुपचूप बाहेर येवून नागरीकांना सांगितले. यावेळी नागरीकांनी धाडस दाखवित घरात जावून चोरट्यांना पकडले. त्यातील एक चोरटा दागिने घेवून पसार झाला. विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी येवून फरार झालेल्या चोरट्याचा मागोवा घेत अवघ्या काही तासातच त्या संशयीतालाही ताब्यात घेतले. मुलीच्या सतर्कतेमुळे विसरवाडीत चोरट्यांचा धाडसी दरोड्याचा डाव फसला आहे.


नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील कुंभारगल्लीत राईस मिलचे मालक भरत गणेश अग्रवाल हे कुटुंबियांसह घरात झोपलेले होते. रात्री दोन वाजेच्या सुमारास ५ दरोडेखोरांनी येवून शेजारी राहणारे प्रकाश कुंभार यांच्या घराच्या जिन्यावरुन भरत अग्रवाल यांच्या घरी प्रवेश केला. यावेळी बंद दरवाजाचा कडीकोंडा तोडीत दरोडेखोरांनी आत जावून बेडरुममध्ये झोपलेले भरत अग्रवाल व त्यांच्या पत्नीला धमकी देवून दोरीने हातपाय बांधले. घरातील कपाटातील लॉक तोडून दागदागिने व रोकड काढून पसार होण्याच्या बेतात चोरटे होते. यावेळी भरत अग्रवाल व त्यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने शेजारी बेडरुममध्ये झोपलेल्या त्यांच्या मुलीला जाग आली. घरात घुसलेल्या दरोडेखोरांचा प्रकार पाहून त्या मुलीने धाडस दाखवून घराबाहेर येवून नागरीकांना बोलवून घडत असलेला प्रकार सांगितला. यावेळी वसाहतीतील जमलेल्या नागरीकांनी एकत्र येवून धाडसाने घरात जावून दरोडा टाकणाऱ्या ४ चोरांना पडकले. परंतू एक चोरटा दागदागिने व रोकड घेवून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच विसरवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे, पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील, पोका. अनिल राठोड, निखील ठाकरे, हिंदूस्थान नाईक, विशाल गावित, मपोका. प्रियंका ठाकरे यांनी घटनास्थळी येवून नागरीकांनी पकडलेल्या ४ चोरट्यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. नंदुरबारचे उपविभागीय अधिकारी संजय महाजन यांनी भेट देवून श्वान पथकालाही पाचारण केले. तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी पथकासह भेट देवून घडलेल्या घटनेची पाहणी करुन माहिती घेतली. फरार झालेला चोरट्याची माहिती मिळताच पथकाने मागोवा घेत त्या संशयीताला ताब्यात घेतले. अग्रवाल यांची मुलगी व परिसरातील नागरीकांनी दाखविलेल्या धाडसामुळे दरोडेखोर पकडले गेले. तसेच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्याची कामगिरी विसरवाडी पोलिसांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

|