नंदुरबार / प्रतिनिधी
स्वच्छता आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे . स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेची सवय रुजवावी यासाठीच या पंधरवड्याचे आयोजन दरवर्षी केले जाते .स्वच्छता ही मोहीम केवळ उपक्रमापुरती मर्यादित न राहता ती लोक चळवळ व्हावी . यासाठी सर्वांनी या लोकचळवळीत सहभागी होऊन आपला गाव व परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांनी केले .
देशात दि १५ सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे . या अनुषंगाने केंद्र शासनाच्या सूचनानुसार दि . १ ऑक्टोबर रोजी 'एक तारीख एक तास महाश्रमदान ' या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . त्यानुसार कोळदा ता जि नंदुरबार येथे महाश्रमदानाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ .सुप्रिया गावित यांच्या उपस्थितीत करण्यात आली . यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करित असताना त्या बोलत होत्या. डॉ . गावित पुढे म्हणाल्या की , दैनंदिन जीवनात स्वच्छतेची सवय अंगीकारल्याने परिसरातील वातावरण प्रसन्न राहून काम करण्यास प्रोत्साहन मिळते .तसेच गाव व परिसर स्वच्छ ठेवल्याने गाव रोगराई पासून मुक्त होते . आज जिल्हाभरात स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत एकाच दिवशी जिल्हा परिषदेच्या वतीने 867 ठिकाणी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे .यात ग्रामपंचायतीतील शाळा ,अंगणवाडी , प्राथमिक आरोग्य केंद्र , या ठिकाणी सकाळी १० वाजता स्वच्छता मोहीम राबविली जात आहे .स्वच्छता मोहीम ही केवळ प्रसिद्धीसाठी उपक्रम न होता ती सवय व्हावी व यासाठी सर्वांनी दैनंदिन जीवनात स्वच्छतेचा अंगीकार करावा असे आवाहनही डॉ गावीत यांनी यावेळी केले .
यानंतर अध्यक्षा डॉ . गावित यांनी उपस्थित ग्रामस्थांना स्वच्छतेची शपथ देऊन ग्रामपंचायत व परिसरात स्वतः श्रमदान करून परिसर स्वच्छता केली . यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मोहिनी वळवी ,उपसरपंच आनंद गावित ,पंचायत समिती सदस्य कालसिंग दादा, ग्राम विकास अधिकारी संजय देवरे ,सर्व ग्रामपंचायत सदस्य ,शिक्षक ,शासकीय कर्मचारी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
0 Comments