दिनांक 13 मे 2023 रोजी मोलगी व अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना स्थानिक नागरिकांकडून गुप्त माहिती मिळाली की, मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील सरी केलीपाडा गावात एका अल्पवयीन मुलीच्या विवाहाचे त्यांचे कुटुंबीय नियोजन करीत आहे, व अक्कलकुवा तालुक्यातील निंबापाटी गावाचा राऊतपाडा येथील अल्पवयीन मुलींचा दिनांक 13 मे 2023 रोजीच विवाह होणार असल्याची माहिती मिळाली. सदर घटनेची माहिती मोलगी व अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना कळविल्याने त्यांनी सदरचे दोन्ही बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलींच्या पालकांचे समुपदेशन करणेबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे मोलगी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या सदस्यांच्या मदतीने तात्काळ माहिती काढली असता, मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील सरी केलीपाडा गावात एका अल्पवयीन मुलीचा विवाह भगदरी ता. अक्कलकुवा येथील तरुणासोबत निश्चित करण्यात आला होता, परंतु मोलगी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश केदार यांनी अल्पवयीन मुलीच्या घरी जावून अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांचे व गावातील नागरिक यांना कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांचे समुपदेशन करुन मनपरिवर्तन केले. अल्पवयीन मुलीच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.
तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांना मोलगी पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. तसेच दिनांक 13 मे 2023 रोजी अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील निंबापाटी राऊतपाडा या गावात जावून अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गावीत यांनी माहिती घेतली असता तेथे अल्पवयीन मुलीचा वालंबा गावातील तरुणासोबत विवाह निश्चित करुन दिनांक 13 मे 2023 रोजीच विवाह होणार होता, परंतु अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गावीत यांनी अल्पवयीन मुलीचे आई, वडील व तेथे हजर असलेल्या नातेवाईकांना तसेच गावकरी यांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन मनपरिवर्तन केले. तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांना अक्कलकुवा पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षता अंतर्गत नंदुरबार पोलीसांनी चार दिवसात पाच बालविवाह रोखल्याने नंदुरबार पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे. तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यात यश येईल. आज पावेतो नंदुरबार जिल्ह्यातील 634 ग्रामपंचायतींपैकी 615 ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आले आहेत. तसेच उर्वरीत ग्रामपंचायतींचे ठराव देखील लवकरच घेण्यात येतील, असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी सांगितले.सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गावीत, मोलगी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश केदार, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मोहन शिरसाठ, पोलीस नाईक अतुल गावीत, किशोर वळवी, खुशाल माळी, पोलीस शिपाई कल्पेश कर्णकार, महिला पोलीस शिपाई सविता जाधव तसेच मोलगी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिलवरसिंग पाडवी, महिला पोलीस नाईक मंगला पावरा, पोलीस शिपाई संतोष राठोड, मेघराज पानपाटील,अनिल नागरगोजे यांनी केली आहे.
0 Comments