नंदुरबार/प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2023 रविवार दि. 4 जून,2023 रोजी नंदुरबार येथे घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.
शहरातील एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर ज्युनियर कॉलेज, स्टेशन रोड, नेहरु चौक, नंदुरबार, जी.टी.पाटील महाविद्यालय, आय.टी.आय.जवळ, शनिमंदिर रोड, नंदुरबार, श्रीमती. डी.आर.हायस्कुल, मुख्य डाक कार्यालय जवळ, अंधारे स्टॉप, नंदुरबार, कमला नेहरु कन्या विद्यालय, स्टेशन रोड, नेहरु चौक, नंदुरबार, डॉ.काणे गर्ल्स हायस्कुल, मुख्य डाक कार्यालय जवळ, अंधारे स्टॉप, नंदुरबार अशा 5 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात रविवार 4 जून 2023 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत परिक्षेसाठी संबंधीत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेशास बंदी असेल. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक वापरासाठी या कालावधी मनाई असेल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0 Comments