Header Ads Widget


तळोदा पोलीस ठाण्यातर्फे जनता दरबाराचे यशस्वी आयोजन, एकाच दिवसात तब्बल 116 तक्रारींचे निवारण..!!


नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सामान्य नागरिकांच्या तक्रारी किंवा समस्यांचे निरसन करण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या मनातील पोलीसांविषयी भिती दूर होऊन पोलीस व जनता संबंध वृद्धिगत व्हावे यासाठी दिनांक 17/05/2023 रोजी तळोदा पोलीस ठाण्याच्या आवारात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. सदर जनता दरबाराचे उद्घाटन जनता दरबारसाठी उपस्थित असलेल्या वयोवृध्द् महिला मायाबाई मंगा वळवी रा. बुधावली ता. तळोदा यांचे हस्ते करण्यात आले. 


सदर कार्यक्रमाचे वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल पवार, महिला  सहायता कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती नयना देवरे, मोलगी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. धनराज निळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, तळोदा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. अमितकुमार बागुल, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजेश गावीत यांचेसह इतर अधिकारी व पेालीस अंमलदार तसेच तळोदा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. 

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की, गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सामान्य नागरिकांनी त्यांना कार्यालयात भेटून त्यांच्या कौटुंबीक, शेतजमीनी विषयी, गुन्ह्यांशी संबंधीत व इतर समस्या / तक्रारी मांडत होते परंतु कार्यालयात बसून त्यांना तक्रारींचे निरसन करता येत नव्हते. पोलीस विभागाचे कामकाज अतिशय व्यस्त असते कधी कायदा व सुव्यवस्था तर कधी गुन्हे तपास तसेच दैनंदिन कामकाज त्यातच एखादा सामान्य नागरिक त्याची तक्रार किंवा समस्या घेऊन पोलीस ठाण्याला आला तर व्यस्त कामकाजामुळे पोलीसांकडून त्याची समस्या किंवा तक्रारीचे समाधान होण्यास विलंब होत होता. पोलीस विभागाकडून सामान्य नागरिकांच्या तक्रारी किंवा समस्यांचे समाधान करण्यासाठी तसेच त्याला न्याय देण्यासाठी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तक्रारदारांचे समाधान करण्यासाठी व सर्व सामान्य नागरिकांना सर्व एकाच ठिकाणी मदत उपलब्ध व्हावी हा असून नागरिकांचा वेळ वाया जावू नये हा आजचा पोलीस व जनता दरबार घेण्यामागील मुख्य उद्देश होता. तसेच नागरिकांनी कोणाच्याही दबावाखाली न येता तक्रार देण्याचे टाळू नये. नागरिकांच्या काही तक्रारी किंवा समस्या असतील तर त्यांनी कसलीही भिती न बाळगता पुढे येऊन तक्रार करावी असे यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी सांगितले. 


नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी जनता दरबारसाठी उपस्थित असलेल्या सर्व सामान्य जनतेच्या समस्या / तक्रारी ऐकुन स्वत: त्यांचे निराकरण करुन जनता दरबाराची सुरुवात केलेली आहे.

अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संभाजी सावंत यांनी आपले मनोगत मांडतांना सांगितले की, पोलीस दलाचे पर्यायाने शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे सामान्य जनतेप्रती असलेल्या कर्तव्य भावनेची जाणीव सर्वांना करून देवून नंदुरबार जिल्हा पोलीस दल सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. सामान्य माणुस आज देखील प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांसमोर येऊन मोकळेपणाने समस्या मांडण्यास घाबरतो. प्रशासनातील अधिकाऱ्यांबाबतची सामान्य जनतेच्या मनातील भिती ज्यावेळी निघून जाईल त्यावेळी प्रशासनाला देखील जनतेच्या समस्या सोडविणे सोईचे जाईल असे सांगितले.


नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या जनता दरबारासाठी तळोदा तालुका व परिसरातील सुमारे 600 पुरुष व स्त्रीया उपस्थित होते. सामान्य नागरिकांच्या समस्या / तक्रारी स्वत: नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी ऐकुन त्यावर तातडीने निर्णय घेऊन तक्रारदारांच्या तक्रारींचे निरसन केले. नंदुरबार जिल्हा पोलीस दलात नागरिकांच्या समस्या ऐकुन त्यावर तातडीने निर्णय घेऊन "जनता दरबार" या अभिनव उपक्रमाची सुरुवात मागील वर्षी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथून केली होती. 

पती पत्नीच्या भांडणातून वाद झालेल्या 09  दाम्पत्यांचा जनता दरबारामध्ये समझोता घडवून आणण्यात आला व नऊ दाम्पत्यांचे मनोमिलन करण्यात यश मिळविले.  त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी नऊ दाम्पत्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या नऊ दाम्पत्यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांचेसह नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे आभार मानले. 

तसेच श्री. संजय उत्तम पटले व श्रीमती संगीता संजय पटले रा. श्रेयस कॉलनी तळोदा या भाऊ बहिणींचा वडीलोपार्जीत शेतजमीनीचा जुना वाद देखील जनता दरबारमध्ये मिटविण्यात आला. तसेच श्री. रतिलाल गबा माळी व श्री. बापू पारधी यांचे शेतातील रस्त्यावरून वाद होवून त्यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. श्री. रतिलाल माळी व श्री. बापू पारधी यांच्यात समझोता करुन त्यांच्यातील वाद हा जनता दरबारामध्ये सोडविण्यात आला. 

सदर जनता दरबारमध्ये कौटुंबीक वादाच्या-31 तक्रारी, शेत जमीनीविषयी- 01 तक्रार, दिवाणी वाद-36 तक्रारी, किरकोळ भांडण व मारामारी-49 तक्रारी, महिला संबंधी-12 असे एकुण 129 तक्रारी मांडण्यात आल्या होत्या. त्यापैकी 116 तक्रारदारांच्या तक्रारींचे जनता दरबारामध्ये निरसन करण्यात पोलीसांना यश आले. यातील बहुतांशी तक्रारी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी स्वत: हाताळल्या. 

सदर जनता दरबारसाठी अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, तळोदा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. अमितकुमार बागुल यांनी विविध पथके तयार करुन ही सर्व प्रकरणे हाताळण्यास मदत केली. उपस्थित नागरिकांनी या कार्याक्रमाचे मोठया प्रमाणात स्वागत केले व त्यांच्या तक्रारींचे निरसन झाल्याने त्यांनी पोलीस विभागाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाची प्रास्तावीक व सुत्रसंचालन स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील  यांनी केले. तसेच भविष्यातही अशा प्रकारचे जनता दरबार नंदुरबार जिल्ह्यातील इतर पोलीस ठाणे हद्दीत लवकरच भरविण्यात येतील असे यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments

|