Header Ads Widget


धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांना गिरणा गौरव पुरस्कार प्रदान..

प्रतिनिधी/अकिल शहा 
चांगुलपणाचा गौरव केल्याने चांगले काम करणाऱ्यांचा उत्साह द्विगुणीत होतो, त्यांना अधिक काम करण्याची ऊर्जा मिळते, इतरांना प्रोत्साहन मिळते असे प्रतिपादन राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केले. नाशिक येथील गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे रौप्य महोत्सवी वर्षातील गिरणा गौरव पुरस्कारांचे वितरण राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले  त्यावेळी ते बोलत होते.

धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल त्यांचा मानपत्र व स्मृतिचिन्ह पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्वल निकम, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे, उद्धव आहेर, नेमीचंद पोद्दार उपस्थित होते. दहिते यांच्यासह यंदाचा पुरस्कार पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे, चित्रपट दिग्दर्शक मंगेश हडवळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस डॉ. नितीन ठाकरे, अहिराणी भाषेच्या गाण्यांद्वारे प्रचार व प्रसार करणारे गायक तथा गीतकार सचिन कुमावत (जामनेर), साने गुरुजी शिक्षण संस्थेचे प्रवीण जोशी, नाशिक कवीचे अध्यक्ष बाळासाहेब मगर, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे, महिलांसाठी योगदान देणाऱ्या स्वाती भामरे, शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे प्राचार्य डॉ. सुभाष भालेराव (येवला) भारतातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षा लासलगावच्या सुवर्णा जगताप यांना प्रदान करण्यात आला.

महाकवी कालिदास कलामंदिरात या पुरस्कारांचे शानदार वितरण झाले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश होळकर, दिलीप पाटील, राजेंद्र निकम, प्रा. शंकर बोराडे, शिवाजी जाधव, प्रल्हाद ठाकरे, संजय फतनानी, जयप्रकाश जातेगावकर आदी निवड समिती सदस्यांसह गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दहिते यांना पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल धुळे जिल्ह्यातून त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments

|