Header Ads Widget


पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहादा येथे "आत्मनिर्भर युवती अभियान" या विषयावर 6 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन ...


प्रतिनिधी/ शहादा 
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने "आत्मनिर्भर युवती अभियान" या विषयावर  6 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथे करण्यात आले होते. 

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या दिलेल्या नियमावलीनुसार 6 दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियान अंतर्गत विविध ठिकाणी क्षेत्रभेट दिली. कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत फक्त विद्यार्थिनींना त्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वावलंबन विकसित करण्यासाठी सायबर-गुन्हेगारी जागरूकता, बँक व्यवहार जागरूकता, कृषी जागृती, आरोग्य जागरूकता, स्वयंरोजगार योजना अशा विविध मार्गांनी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यापीठाने 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत आत्मनिर्भर युवती अभियान योजना सुरू केली आहे.

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी पाच घटकांना भेट दिली. त्यात पहिल्या दिवशी कृषी जागृती याविषयी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कृषी महाविद्यालय शहादा येथे भेट दिली त्यात कृषीविषयक सखोल ज्ञान घेतले. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एल. पटेल यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना कृषीविषयक माहिती दिली. यावेळी मुलींनी सेंद्रिय शेती कशी केली जाते तसेच माती आणि वैशिष्ट्याविषयी माहिती मिळवली. मुलींनी (गांडुळाद्वारे) वर्मी कंपोस्ट नावाच्या पद्धतीने सेंद्रिय खत कसे बनवायचे याची नवीन पद्धत पाहिली आणि पॉली-हाऊस आणि ग्रीनहाऊस इफेक्टबद्दल ज्ञान मिळवले. 

महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी यावेळी कृषी महाविद्यालयात वृक्षारोपण केले. दुसऱ्या दिवशी बँक व्यवहार जागरूकता विषयी शहादा येथील दि नंदुरबार मर्चंट कॉ-ओपरेटिव्ह बँकेला भेट दिली. यावेळी बँकेचे व्यवस्थापक गणेश पुराणिक  यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना बँक व्यवहार जागरूकता विषयी माहिती दिली. त्यात विद्यार्थिनींना भविष्यातील नियोजनासाठी बचत कशी ठेवावी तसेच ऑनलाइन व्यवहार बँकिंग कशा पद्धतीने हाताळावी आणि व्यवसाय सुरू करायचा असल्यास बँकेत चौकशी कशी करावी याबद्दल सांगितले. तसेच बँकेची कार्यप्रणाली विषयी माहिती दिली. तिसर्‍या दिवशी आरोग्य जागरूकता या विषयी शहादा येथील सुयोग हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी डॉ. सुषमा चौधरी यांनी वैयक्तिक आरोग्याविषयी माहिती दिली. डॉ सुषमा चौधरी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना वैयक्तिक आरोग्य आणि स्वच्छता कशी राखावी याचे मार्गदर्शन केले. त्यानंतर पीसीओडी आणि पीसीओएस सारख्या आजाराविषयी थोडक्यात माहिती दिली.

चौथ्या दिवशी सायबर-गुन्हेगारी जागरूकता विषयी सायबर गुन्ह्यांविषयी शहादा पोलिस स्टेशनला भेट दिली. यावेळी प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे आणि पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांनी सायबर गुन्ह्याबद्दल माहिती दिली आणि स्वतंत्र कसे राहायचे हे देखील शिकवले. यावेळी 112 क्रमांकाचे महत्त्व याविषयी माहिती दिली तसेच सोशल मीडिया आणि ऑनलाइन फ्राड कशा पद्धतीने होतात आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली. पाचव्या दिवशी स्वयंरोजगार योजना विषयी विद्याविहार येथील  स्वयंरोजगार युनिट सर्वज्ञान महिला गटाला भेट दिली. 

यावेळी श्रीमती कविता पी. पाटील (सर्वज्ञान महिला गटाच्या सदस्या) यांनी स्वयंरोजगाराची माहिती दिली. महिलांना स्वयंरोजगाराची संधी प्रत्येक ठिकाणी असते फक्त त्यात महिलांनी पुढे येऊन कार्य करायला पाहिजे. शेवटच्या दिवशी समारोप प्रसंगी संवाद कार्यक्रम ठेवण्यात आला होता. समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, प्रमुख अतिथी प्रा.डॉ सुनिला पाटील उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थीनींनी पीपीटीच्या माध्यमातून आत्मनिर्भर युवती अभियान अंतर्गत विविध ठिकाणी भेट दिलेल्या घटकांची माहिती सादर केली. या 6 दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियानात 60 पेक्षा जास्त विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला होता. या 6 दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियान कार्यक्रमासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. सदर आत्मनिर्भर युवती अभियानाच्या समारोप प्रसंगी  सूत्रसंचालन कु.दिव्यश्री पाटील यांनी केले तर आभार कु.देवेश्री पटेल यांनी मानले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ हेमंत सूर्यवंशी, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी व युवती सभा प्रमुख प्रा.सौ. अमृता पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments

|