Header Ads Widget


उष्माघातापासून संरक्षण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करावेत; जिल्हाधिकारी मनीषा खत्री


नंदुरबार : (जिमाका वृत्तसेवा): आगामी दिवसामध्ये वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री यांनी केले आहेत.

उष्माघाताची कारणे

उन्हामध्ये शारिरीक श्रमाचे, मजुरीचे कामे फार वेळ करणे, कारखान्यांचे बॉयलर रुममध्ये व काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येणे ही उष्माघात होण्याची कारणे आहेत.

उष्माघाताचा त्रास उद्भवल्यास  करावयाचे प्रथमोचार जाणून घेऊया.....



अशी आहे उष्माघाताची लक्षणे 

शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे, थकवा येणे, ताप येणे (102 पेक्षा जास्त) त्वचा कोरडी पडणे, भुक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे,डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन, अस्वस्थ, बेशुध्द अवस्था उलटी होणे  इत्यादी.

जोखीमेचा गट

वय 5 वर्षांपेक्षा कमी असणारे बालक व 65 वर्षांपेक्षा  वय असणारे ज्येष्ठ नागरिक, अधिक कष्टाची सवय नसणारे व्यक्तीं, धुम्रपान, मद्यपान,कॉफी पिणारे व्यक्ती, मुत्रपिंड, ह्दयरोग, यकृत, त्वचा विकार, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी रुग्ण. तसेच जास्त तापमानात, अतिआर्द्रता, वातानुकूलनाचा अभाव, तंग कपडे, शेतकाम, कारखान्यातील काम, ऊन  आणि उष्णतेशी संबंधित व्यवसाय करणारे व्यक्तींचा जोखीम गटात समावेश होतो.

प्रतिबंधात्मक उपाय

वाढत्या तापमानाच्या वेळेत कष्टाची कामे शक्यतो सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत, उष्णता शोषून घेणारे कपडे उदा. काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरु नयेत, सैल व उष्णता परावर्तित करणारे पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. भरपूर पाणी प्यावे, सरबत प्यावे. उन्हामध्ये काम करणे टाळावे. सावलीत विश्रांती घ्यावी. शक्यतो उन्हात फिरणे टाळावे. आवश्यक कामे असल्यास उन्हात जाण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे किंवा लिंबू शरबत प्यावे. उन्हात जाण्याअगोदर जेवण करावे, रिकाम्या पोटी उन्हात जावू नये, कान व डोक्याचा उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे. डोक्याभोवती पांढरा रुमाल गुंडाळावा. गॉगल्स व हेल्मेटचा वापर करावा. वृध्दांनी  व बालकांना उन्हात फिरु देऊ नये.

उपचार

रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखा व कुलर वातानुकूलीनाची व्यवस्था करावी. रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.रुग्णांस बर्फाच्या पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक लावावेत, ओआरएस सोल्युशन द्यावे., उन्हाळयामुळे उष्माघाताचे रुग्णावर उपाययोजना करणेसाठी व मृत्यू टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी, कुटीर रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांनी आवश्यक ती सर्व तयारी करुन ठेवावतीत उदा. हवेशीर खोली, पुरेसा औषधी, सलाईनचा साठा, खोलीत पंखे, कुलर इ. सोय करावी. 

काय करावे, काय करु नये

काय करावे - तहान लागली नसली तरी भरपुर पाणी, सरबत प्यावेत, हवा खेळती राहण्याकरीता पंख्याचा वापर करावा, सैल व सौम्य रंगाचे सुती कपडे वापरावे, सावलीत थांबणे, हळुवार चालावे, टोपी, फेटा, चष्मा वापरणे, मजुर वर्गाने वारंवार विश्रांती घ्यावी, उन्हातुन आल्यावर चेहऱ्यावर ओले कापड ठेवावेत.

काय टाळावे- मद्य, सोडा, कॉफी, अती थंड पाणी पिणे टाळावेत. गरज नसतांना उन्हात बाहेर फिरणे, तंग, व गडद कपडे वापरणे, सवय आहे म्हणून उन्हात निघणे, अति व्यायाम करणे, बंद कार मध्ये राहणे, अति शारिरिक कष्टाचे कामे करणे. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत. उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार करुन घ्यावा. उष्माघात उपचारासाठी शासकीय रुग्णालयांत सज्जता ठेवण्यात यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री यांनी केले आहेत.

Post a Comment

0 Comments

Today is Thursday, April 10. | 11:54:37 PM