Header Ads Widget


गावठी बनावटीचे अवैध पिस्टल बाळगणार्याला नंदुरबार शहर पोलिसांनी केले अटक , एक लोखंडी पिस्टल व एक काडतूस जप्त केले...!!

 

नंदुरबार बुलेटिन : नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण / उत्सवांच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समाजकंटक गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हाया या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी अवैध अग्निशस्त्र शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कायदेशीर करणेबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना मासिक गुन्हे सुचना दिल्या होत्या. 

 

वरिष्ठांच्या सुचना मार्गदर्शनानुसार पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अवैध अग्निशस्त्र शस्त्र बाळगणाऱ्यांची इत्यंभूत माहिती घेवून आपले बातमीदारांमार्फत माहिती घेत होते. दिनांक 30/01/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांना डायल-112 द्वारे माहिती मिळाली की, नंदुरबार शहरातील बस स्थानकाजवळ एका इसमाजवळ बंदुक दिसून आली आहे, अशी माहिती दिली. सदरची माहीती नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना कळवून माहीतीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांना सदरची माहिती देवून संशयीत इसमाचा शोध घेवून ताब्यात घेणेबाबत कळविले. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने नंदुरबार शहरातील बस स्थानकाजवळ आजू-बाजूच्या परिसरात जावून संशयीत इसमाचा शोध घेतला असता एक इसम गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना पाहून पळून साई प्लाझामध्ये पळू लागला, म्हणून पथकाला संशय आल्याने त्यास पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. 

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाला त्याचे नाव गाव विचारले असता दिपक मनोजभाई यादव वय-27 रा. अंकुर अपार्टमेंट पर्वत गाव, सुरत असे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाची झडती घेतली असता त्याच्या कब्जात 15 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल 600/- रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस मिळून आले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडे अधिक विचारपूस केली असता तो, प्लॉट क्रमांक 111, राणी लक्ष्मीबाई चाळ, कांदीवली ईस्ट, मुंबई येथील राहाणार असून मागील 04 महिण्यांपासून उत्तर प्रदेश राज्यातील जोनपूर जिल्ह्याच्या रामपुर गावात राहात असलेबाबत सविस्तर माहिती दिली.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे नंदुरबार शहरामध्ये येण्याचे कारण काय ? याबाबत माहिती घेण्यात येत आहे. तसेच सदर गुन्ह्यात सहभाग असणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी सांगितले.

सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक श्री. एस.बी. आहेर, पोलीस हवालदार संदिप गोसावी पोलीस नाईक भटु धनगर, पोलीस अमंलदार विशाल मराठे, अनिल बढे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

|