प्रतिनीधी/बिलाल कुरेशी
पँथर यशपालजी सरवदे यांचे पहाटे उपचारा दरम्यान निधन झाले. कळंब शहरातील भीम अनुयायांनी आदरांजली वाहिली.
पँथरला अखेरचा जय भीम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा दिन, दलित, शोषितांच्या अस्मितेचा लढा. विद्यापीठ नामांतराचा ठराव तत्कालीन विधानसभेत सर्वानुमते मंजूर होऊनही, त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यासाठी आंबेडकरी जनतेला निकराची लढाई लढावी लागली. तेंव्हा नामांतर का होत नाही असा सवाल करत, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कडोकोट बंदोबस्तातील प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर झेप घेणारा तत्कालीन निडर ‛पँथर‘ होते यशपाल सरवदे. तेंव्हाचे मुख्यमंत्री होते खुद्द शरद पवार. यशपाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर झेप घेऊन त्यांना हा जाब विचारला होता. सरकारी यंत्रणेची यामुळे अक्षरशः भंबेरी उडाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री तेंव्हा सोलापूर दौऱ्यावर होते. यशपाल सरवदे नावाचे हे बेधडक वादळ, निडर झंझावात आज रविवारी 26 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री कायमचा विसावला आहे. त्यांचे ज्वलंत कर्तृत्व जनमानसात कायम स्मरणात राहील असेच आहे.
अल्पशा आजाराने पुणे येथे त्यांचे निधन झाले. उस्मानाबाद येथील स्मशानभूमीत दुपारी पाचच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर बौद्ध धम्म पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला . त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुले, जावई असा परिवार आहे.
उस्मानाबाद जिल्हा म्हणजे आत्ताच्या लातूर जिल्ह्याचाही त्यात समावेश होता. या परिसरातील आंबेडकरवादी जनतेत सरकारविरोधी असंतोष होता. त्याचे कारण होते, विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव होऊनही त्याची अंमलबजावणी सरकार करत नाही. या अन्यायाविरुद्ध सनदशीर मार्गे आक्रमक लढा उभारणारे अग्रणी नेतृत्व म्हणजे यशपाल सरवदे होय. कणखर, अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची राज्यात ख्याती होती. उस्मानाबाद नगरपालिकेचे तत्कालीन उपनगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
1997 साली त्यांनी ऐतिहासिक अशी धम्म परिषद उस्मानाबाद येथे घेतली होती. स्थळ होते आत्ताचे जिल्हा क्रीडा संकुल. सलग दोन दिवस येथे अक्षरशः लोकांची रीघ लागली होती. शुभ्रवस्त्र परिधान केलेली असंख्य जनता ठिकठिकाणाहून सहभागी झाली होती. दैदीप्यमान अशा पद्धतीने झालेल्या या धम्म परिषदेने लोकांचे डोळे दिपले होते. सलग दोन दिवस शहरातून निघालेल्या धम्मयात्रा आणि धम्म देसनेने लोक तृप्त झाले होते. अशी धम्म परिषद पुन्हा झाली नाही. त्या आठवणी लोक आजही सांगतात. भारतीय संविधानाची प्रास्ताविका भीमनगरातील क्रांतिचौकात आणि नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसविण्यात त्यांचे अविस्मरणीय योगदान आहे.
त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख खूप मोठा आहे. त्यांच्या अविस्मरणीय आठवणी कायम स्मरणात राहतील. या मराठवाड्याच्या बुलंद आवाजाला...पँथरला शेवटचा सलाम... विनम्रपणे आदरांजली.. वाहण्यात आली. यावेळी राहुल हौसलमल, अमर गायकवाड, सतपाल बनसोडे, अनिल हजारे, सी आर घाडगे सर, चिलवंत गुरुजी, राजाभाऊ गायकवाड, भास्कर सोनवणे, जगताप सर, मुकुंद साखरे, सुनील गायकवाड,शिवाजी शिरसाट धावरे सर, डी बी गायकवाड, टी जी माळी, मोराळे सर वाघमारे सर के.वी सरवदे सर, विशाल वाघमारे, कसबे सर, प्रकाश खंडागळे, भास्कर जाधव, डी टी वाघमारे, खांडके सर, भाऊ कुचेकर, घुले सर, अनिश शेख, भाऊ गांधले, मुसद्दीक काझी. प्रमोद ताटे आदी उपस्थित होते.
0 Comments