Header Ads Widget


जो हारा वो अब भी सिकंदर........!!!!!!

" जगभरात आंतरराष्ट्रीय नॉर्म्सनुसार जी कुस्ती, वा तिचे वेगवेगळे प्रकार अगदी प्राचीन अथेन्स अॉलम्पिक स्पर्धेतून ग्रीको रोमन असो वा जपानमधले सुमो पैलवानांचे ज्युदो वगैरे  , हे मॅटवरच खेळले जातात म्हणून शेवटचा सामना आंतरराष्ट्रीय मानकानुसार मॅटवर खेळला जातो.
मुळात पै. सिकंदर शेखची जी एक्स्पर्टीज आहे, ती लाल मातीच्या आखाड्यातील आहे. तो तिथला हिरो आहे.
भारतात लाल मातीला ग्लॅमर आहे. मॅटवरची कुस्ती अजूनही पूर्णपणे आपल्या लोकांना पचनी पडत नाही. अष्टगंध, हळद, तूप टाकून मऊशार लाल माती खोऱ्याने उपसून पैलवानांचा आखीव, रेखीव निरोगी देह उजळतो. तिथं उपसलेला घाम त्याला झळाळी देतो. लाल मातीचे आकर्षण आपल्या जनमानसाला पिढ्यांपासून आहे.
पै. शाहूजी महाराजांनी जगभरातून, भारतातून पैलवानांना कोल्हापूरात आणून त्यांना पोसले, सांभाळले व लाल मातीतच खेळवले. कुस्ती हा उच्चकोटीचा शौक आहे. हे ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. जातधर्म गरीबश्रीमंत देश प्रांत असा कोणताही भेद न ठेवता  अतिशय उच्चकोटीचा प्रामाणिकपणा महाराजांनी कुस्तीत दाखवला म्हणून कुस्ती खऱ्या अर्थाने बहरली.
लाल मातीच्या कुस्तीचे ग्लॅमर खऱ्या अर्थाने जनताजनार्दनाचे असते म्हणून त्यात सगळंच येतं. बक्षिसांची प्रचंड लयलूट होते, प्रसिद्धी मिळते, नाव मिळते, असं सगळं मिळतं. अशीच मैदानंच्या मैदानं सिकंदरने मारली आहेत.
   हा ग्राफ मोठा आहे. हरयाणाच्या जस्सा पट्टी सारख्या नामांकित अवाढव्य मल्लाला त्याने पाडलं आहे.
म्हणूनच त्याची एक्स्पर्टी हि लाल मातीतली आहे. ० ते १०० जाणं हे वेगळं आहे आणि ८० ते १०० हे वेगळं आहे.
सिकंदर हा ० ते १०० गेलेला आहे आणि मॅटवरचे पैलवान पहिल्यापासूनच मॅटवरच्या सरावात असल्याने ते ८० ते १०० गेलेले आहेत. हा अत्यंत महत्त्वपूर्ण फरक आहे. म्हणजेच काय तर सेम लाईनवरून सुरूवात झालेली नाही.
सगळ्यात आधी तर आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की, लुटूपुटीची लढाई आणि अंतिम युद्धात प्रचंड फरक असतो. अंतिम युद्धात जे दोन वीर एकमेकांना भिडतात तेव्हा ते कोणत्याच प्रकारे एकमेकांना कमी नसतात. ताकदीचा विषयच नसतो, विषय बनतो क्षणांचा, तुमच्या अभ्यासाचा, तुमच्या चपळ निर्णयांचा..... म्हणजेच तिथे खरा खेळ बनतो मेंदूचा......

       खेळणारांचा अन श्वास रोखून बघणारांचाही......!!!!!

१) चार गुण कमीजास्त केल्याने सिकंदरचा रिदम तुटला पुन्हा जुळणे कठीण असते. हे मानसिक हनन परिक्षकांनी बरोबर साधले.
२) लाल मातीवर एक्स्पर्ट असलेल्या मल्लाला मॅटवरचा सराव नसल्याने त्याचे पाय घसरू शकतात. तो लाल मातीतल्यासारखी मजबूत ग्रीप घेऊ शकत नाही.
 ३) तिसरी गोष्ट म्हणजे ९७ किलो वजनी गटानंतर कुस्तीच्या नियमानुसार यानंतरचा गट खुला होतो, म्हणजे ९७ किलो वजनाच्या पैलवानाला १३० वजन असलेल्या पैलवानाशीही खेळावे लागते म्हणजेच वजनी गटाचे बंधन तुटते.
      याने काय होते तर एखादा असा वजनी पैलवान बद्कन पाठकाडावर बसला तर खालच्या कमी वजनाच्या पैलवानाला उसळी मारणे अतिशय कठीण असते.
या बाबीसहीत सिकंदर लढला. आता हे जेवढे खरे आहे तेवढेच आणखी इतर अनेक गोष्टींचा ताण घेऊन तो लढला हेही तितकेच खरे आहे.
          कुस्ती अन पैलवान हे बलशाली, प्रभुत्वशाली, दबंग लोकांनी आपले सामाजिक राजकीय स्थान अबाधित ठेवण्यासाठी चिन्हांकित केली आहे हे तर आहेच, तुम्ही काय आता शाहूजी महाराजांच्या काळात नाही की कुस्तीला राजाश्रय मिळून सर्व जातीधर्मांना, भटक्या जातींनाही मुक्त आणि सन्मानाची संधी मिळेल..
      "सनातन धर्म की जय" अशी घोषणा देणे, महेंद्र म्हणजे भगवान शंकराचे नाव आहे हे  समालोचकाने ओरडून ओरडून बोलणे हे नियोजितरित्या अगदी व्यवस्थित दबाव उत्पन्न करणे आहे हे स्पष्ट दिसते आहे.
आपले सामाजिक राजकीय स्थान अशा प्रकारे चिन्हांकित करणे आहेच. अयोध्येच्या परिसरात ठाकूर असलेल्या व आखाडे चालवणाऱ्या तिथल्या दबंग ब्रिजभूषण सिंह ला उगीच बोलवले नाही. हे लोक झाडून काम करत होते.
तुमच्याकडे दोन साखर कारखाने आहेत, दूध डेअऱ्या, पतसंस्था, शिक्षणसंस्था असं सगळं आहे. हाक मारेपर्यंत पाच पन्नास ट्रॅक्टर तुमचा मळा नांगरायला झटक्यात हजर होतात मग तरीही तुम्ही दावणीला दीड दीड लाखाचे चार बैलं का सांभाळता???

      तर स्पष्ट आहे असूद्या शर्यतीला..... हा तर मान आहे.
जुन्या सरंजामी स्थानावर नवे कलम करून आपले स्थान अबाधित ठेवण्याची धडपड अशी सगळीकडेच दिसून येते.
हे खरे दुखणे आहे. आम्हाला यातून खरी मुक्ती हवी आहे....!!!!
बरं असं नाही की अशी उदाहरणे आपल्याकडे नाहीत. याच महाराष्ट्र केसरी ला ज्या पै. लक्ष्मण वडार यांनी दोनदा जिंकले त्यांनी रस्त्यावरची खडी फोडत फोडत वडाराच्या घरात मानाची गदा आणून दाखवली. आमच्याकडेच्या पै. नरसिंह यादवांनी सलग तीनदा महाराष्ट्र केसरी जिंकला.
असो विजयी मल्लांचे हार्दिक अभिनंदन करुया आणि या सर्व पैलवान जे सामील झाले होते त्या सर्वांनाही नव्या दमासाठी शुभेच्छा........!!!!

( सदर लेखातील बाबी रिटायर्ड पोलिस अधिकारी व अॅथलीट Vishal Waghmare साहेब व Babasaheb Thorat साहेब, औरंगाबाद ग्रामीण पोलीस यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतील आहेत. चुकीबद्दल दुरूस्ती करण्यास तत्पर......!!!!)

✒️महेंद्र लंकेश्वर

Post a Comment

0 Comments

|