Header Ads Widget


एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडीचे प्रकार, नवापूर पोलीसांसमोर चोरटयांचे आव्हान!


नवापूर!Navapur/LivenationNews

नवापूर शहरात थंडीचे प्रमाण वाढले की चोरीच्या घटनादेखील वाढतात. शहरातील वेडूभाई गोविंदभाई नगर येथे दोन ठिकाणी घरफोडी करण्यात आली. त्यानंतर आदर्शनगरात दोन ठिकाणी घरफोडी झाली. अशा चार बंद घरांना चोरट्यांनी टार्गेट करून सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना नवापूर शहरात घडली आहे.

शहरातील आदर्शनगर वेडूभाई गोविंदभाई नगरात झालेल्या चोरीने नवापूर शहरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बर्‍याच दिवसांपासून घरफोडीचे सत्र थांबले होते.

परंतु आता पुन्हा घरफोडीचे सत्र सुरू झाल्याने नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षकांना चोरटयांनी आव्हान दिले आहे. याबाबत नवापूर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२१ जानेवारी रोजी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान वेडूभाई गोविंदभाई नगरात दोन ठिकाणी घरफोडी करण्यात आली.

माजी आमदारांच्या कन्या शिक्षिका यांच्या घरातील कडी कोयंडा तोडून घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर शेजारी असलेल्या घराकडे चोरट्याने मोर्चा वळवला. यात वनिता विद्यालयातील शिक्षिका पुष्पा रिनेश गावित शैक्षणिक सहलीला गेले असता अडीच वाजेच्या सुमारास त्याचे पती घराला कुलूप लावून त्यांना घेण्यासाठी शाळेत गेले,

त्यादरम्यान तासाभरातच चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून डल्ला मारला. घरात वरच्या मजल्यावर गोदरेज कपाटातून सासूचे पारंपारिक चांदीचे दागिने व त्यांचे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली साधारण १ लाख ३६ हजार रूपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. यासंदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी

आदर्श नगरात काल रात्री दोन घरात चोरीचा प्रयत्न झाला. सेवानिवृत्त लक्ष्मण रूबजी वसावे रा.कोळदा व स्वस्तिक अपार्टमेंटमधील दुसर्‍या मजल्यावर कृषी विभागातील सुशील कोकणी गावाला गेले असता त्यांच्या घरात चोरट्याने मध्यरात्रीच्या दरम्यान घरफोडी केली आहे.

घराचा लोखंडी दरवाजाच्या कडीकोंयडा तोडून घरातील पेटी, गोदरेज कपाट, लाकडी पलंग घरातील सामान चोरट्याने अस्ताव्यस्त केला आहे, घरातून नेमके काय गेले अजून घर मालकाला कळू शकले नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी घरफोडी झालेल्या ठिकाणी पाहणी केली आहे.

नवापूर पोलीस लवकरच चोरट्यांना जेरबंद करतील असे त्यांनी सांगितले.त्या अनुषंगाने नवापूर पोलीस तपास करीत आहेत.

नवापूर शहरात चार ठिकाणी झालेल्या घरफोडीत एकाच पद्धतीने कडी कोंयडा तोडून बंद घरांना टार्गेट करून चोरी करण्यात आली आहे. चोरटे सराईत असल्याने चोरी करताना कोणालाही भनक लागू दिली नाही.

नवापूर पोलिस मुख्य रस्त्यावर रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग होते, त्याचप्रमाणे रहिवासी भागातदेखील पेट्रोलिंग होण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. नवापूर शहरातील घरफोडीचे सत्र थांबवण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात. नवापूर पोलिसांनी तीन पथके चोरट्यांच्या शोधात रवाना केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Post a Comment

0 Comments

|