नंदुरबार !Nandurbar/LivenationNews
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 व्या वर्धापन दिन समारंभाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम गुरुवार 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस मुख्यालय, नविन पोलिस कवायत मैदान, स्व.राजीव गांधी मार्ग टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्याहस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, तथा शासकीय अधिकारी, विविध संस्था, शासकीय राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाच्या वेळेत इतर ठिकाणी कुठल्याही शासकीय व अर्धशासकीय कार्यक्रमाचे आयोजन करू नये. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 वा वर्धापन दिन समारंभाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम 26 जानेवारी 2023 रोजी राज्यभर एकाचवेळी सकाळी 9-15 वाजता करण्यात येणार असल्याने या दिवशी सकाळी 8.30 ते 10.00 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 च्या पुर्वी किंवा 10 वाजेनंतर करावा. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा, असे जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0 Comments