Header Ads Widget


लाचखोर तलाठ्याला दोन वर्ष कैदेची शिक्षा व 5000 रुपये दंड जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावले आहे.



नंदुरबार! Nandurbar/LivenationNews 

अक्कलकुवा तालुक्यांतील गदवाणी  शिवारातील फळझाडांची नोंद होण्यासाठी एका शेतकर्‍याकडून  सुमारे 30 हजाराची लाच मागून यातील 10 हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी लाचखोर तलाठ्याला शहादा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षे कैदेची व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

तक्रारदार यांनी अक्कलकुवा तालुक्यातील गदवाणी शिवारात साग, फणस, चिकू, आंबे, नारळ अशा झाडांची लागवड केली होती. यामुळे तक्रारदाराच्या गट नंबरमध्ये सदर झाडांची नोंद होण्यासाठी संबंधित तक्रारदारांनी लोकसेवक तलाठी श्री.कर्णे यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र सदर झाडांची नोंदणी करण्यासाठी तलाठी कर्णे यांनी तक्रारदाराकडून 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 10 हजाराची लाच स्विकारत असतांना तलाठी कर्णे यांना पंच व साक्षीदारांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले होते.



यामुळे त्याच्याविरुद्ध लाच स्विकारणे तसेच आपल्या पदाचा दुरुपयोग करुन भ्रष्ट मार्गाने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी लाचेची मागणी करुन स्विकारल्याने अक्कलकुवा पोलिसात सन 2014 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्याच्या सुनावणीत शहादा जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरीक्त सत्र न्यायाधिश-1 सी.एस.दातीर यांनी संशयित तलाठी कर्णे यास साक्षी व पुराव्यांच्या आधारे दोषी ठरवून काल दि.7 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक कायदा, 1998 चे कलम 7 प्रमाणे एक वर्ष कैदेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी सुनावली आहे.

तसेच कलम 13 (1) (ड) सह 13 (2) मध्ये दोन वर्ष कैदेची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास दोन महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.सदर खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता स्वर्णसिंग गिरासे यांनी सरकारतर्फे काम पाहीले.

सदर गुन्ह्यात तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक आर.आर.बोठे, आर.व्ही.पगारे यांनी केला आहे. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक समाधान वाघ, पोना.अमोल मराठे यांनी कामकाज पाहीले.कोणीही लाच मागत असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उपअधिक्षक राकेश चौधरी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

|