LivenationNews...
सहसंपादकीय/सईद कुरेशी
वस्त्र जरतारी असो किंवा साधं, मात्र या वस्त्रातून साकारलेली आई-आजीच्या हातची गोधडी ही मायेची ऊब देणारी ठरते. आज गोधडीचं रूप बदललं आहे. गोधडी वापरणं हे जुनाट लक्षण मानलं जात आहे. याच्या जागी नव्या मऊशार चादर, ब्लांकेटचे नवे प्रकार बाजारात दाखल झाल्याने हात शिलाई केलेली गोधडी खरीतर आज कुणाकडे पाहायला देखील मिळणं तशी दुर्मीळच म्हणावी लागेल.
घरात जुनं वस्त्र असेल, नऊवारी, सहावारी साडी असेल तर ती साडी फेकून अथवा फाडून टाकण्यापेक्षा त्या साडीचं एक वस्त्र मायेने विणलं जात होतं. जाडसर धागा आणि जाडसर सुईने साडीचे चार फेरे करून किंवा त्यात अजून काही वस्त्र टाकून ती गोधडी तयार करण्याचं कसब घरातील गृहिणींना अगदी छान जमायचं. फावला वेळ कसा घालवायचा, असा कधी त्यांच्यासमोर प्रश्न पडला नसावा सहसा. कारण, या गृहिणींच्या हाताला प्रचंड काम असायचं. गोधडी शिवतानाचा वेळ कसा जायचा तेही कळायचं नाही, शिवाय छानशी गोधडीही शिवून व्हायची.
मायेची ऊब दाटायची या गोधडीत. थंडी अलगद मावायची या गोधडीत. घरचं विणकाम, आईच्या हातची शिलाई, रंगांचा अनोखा नजराणा, ही गोधडी माझी, हा रंग माझा असं ठरवून आईने शिवलेली गोधडी शिलाई करण्याच्या आधीच घरातल्या घरात बुक होऊन जायची. गोधडीचे टाके भुलवतात मनाला. टाक्यांचे एकसारखे प्रमाण त्या गोधडीवर एखाद्या नक्षीप्रमाणे उमटून जाते. एखादी कलाकुसरही या टाक्यांच्या मार्फत केली जाते.
अलीकडे गोधडीचे प्रमाण फारसे अनुभवास मिळत नाही. गोधडीची शिलाई करण्याचे, पण एक कसब आहे. टाक्यांचे प्रमाण एकाच प्रकारचे, एकाच टाईपमध्ये शिलाई केलेले दिसून येतात. गोधडीत एक ना अनेक प्रकारच्या वस्त्रांचा वापर केला जातो. कपडयांचे कटिंग करून वेगवेगळया डिझाईन करून त्या गोधडीवर शिलाई केल्या जातात. हाती शिलाई करण्याचे कसब काही ठरावीक जणींनाच अवगत असते. त्यात वेळही भरपूर जातो. त्यामुळे झटपट गोधडी शिलाई करण्यासाठी मशीनचाही वापर केला जातो.
गोधडीवर सुंदर नक्षीकाम केलेले असेल, तर ती गोधडी अधिक आकर्षित दिसते. त्यावर कपडयांचे कट लावले जातात. तर काही वेळा त्यावर कापड कापून त्याची डिझाईन बनविली जाते. गोधडीवर चौकोनी, त्रिकोणी तुकडे कापून लावणे, किंवा दोन ते तीन रंगात गोधडी साकारणे, त्यावर कलाकुसर करणे आदीमुळे गोधडीचे नवे रूपही न्याहाळता येते. आपल्याकडील जुनी वस्त्र टाकून देण्यापेक्षा त्याच्या गोधडया शिलाई करून घेतल्या, तर गरिबांचा त्या आधार बनू शकतात. गरिबांना त्या गोधडीची ऊब मिळू शकते.
लहान बाळासाठी, तान्हुल्यासाठी काही ठिकाणी आजही छोटया-छोटया गोधडया साकारल्या जातात. तर काही संस्थांमार्फतही गोधडी शिलाईची प्रशिक्षणे घेतली जातात. गरिबांना, निराधारांना या गोधडया मायेची ऊब देणा-या ठरतात. सुरक्षितता प्रदान करणा-या ठरतात. थंडीमध्ये विशेषत: गोधडीचा वापर केला जातो. एरव्ही त्यांची जपणूक करताना त्यांचे स्थान ट्रंकेमध्ये दिसून यायचे आणि थंडीची चाहुल लागली की, या गोधडया पुन्हा काढल्या जायच्या.
आजच्या युगात फॅशनच्या जमान्यात गोधडीचे रूप हे साधेसे समजले जाते. जास्त वापर होताना दिसून येत नाही. त्याची जागा आता नव्या उबदार चादर, ब्लांकेटनी घेतल्याचे दिसून येते. गोधडीचं रूप हे जुनं असलं तरी मायेची ऊब त्यात सतत सामावलेली दिसून येते. अलीकडे घराघरात गोधडी दिसणं तसं दुर्मीळच! पण, वेळ घालवण्यासाठी, कलाकुसर करण्यासाठी, आपल्यासाठी नाही, तर गरिबांसाठी तरी या गोधड्या विणल्या गेल्या, तर थंडीपासून संरक्षणासाठी ओळख असलेली मायेची गोधडी ही गरीब निराधारांसाठी मायेने पांघरली जाईल हे नक्की!
0 Comments