नंदुरबार ! Nandurbar / LivenationNews
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, नंदुरबार व तालुकास्तरावर शनिवार 11 फेब्रुवारी,2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डि.व्ही. हरणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्व प्रकारचे दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात दावे, कौटुंबिक हिंसाचार, चलनक्षम दस्तऐवज प्रकरणे, किरकोळ स्वरुपाची दिवाणी प्रकरणे, भूसंपादनाशी संबंधित असणारी प्रलंबित प्रकरणे या अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर दाखलपुर्वक प्रकरणांमध्ये सर्व प्रकारचे तडजोडक्षम प्रकरणे, उदा. बँक कर्ज, पाणीपट्टी, दूरध्वनीदेयक, वीजबिल इत्यादी थकबाकी वसुलीची प्रकरणे ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांनी त्यांच्या अखत्यारीतील थकबाकी बाबतची दाखलपूर्वक प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवावयाची असल्यास जिल्ह्यातील कार्यालयांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार येथे, तर तालुकास्तरावरील कार्यालयांनी तालुका विधी सेवा समितीकडे संपर्क साधावा. जास्तीत जास्त नागरिकांनी राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. हरणे यांनी केले आहे.
0 Comments