अक्कलकुवा प्रतिनिधी - प्रकाश नाईक
अक्कलकुवा :- रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा असुन आरोग्य विभागात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रामाणिक पणे सेवा देऊन रुग्णांना न्याय द्यावा तसेच डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे कोणाचाही जीव जाऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे प्रतिपादन आमदार आमश्या पाडवी यांनी केले.
शासनाच्या आरोग्य विभागा कडुन अक्कलकुवा आणि धडगाव या दोन तालुक्यासाठी १३ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या त्या रुग्णवाहिकेंचा लोकार्पण सोहळा अक्कलकुव्यातील आमदार कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष स्थानावरुन आमदार आमश्या पाडवी हे बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, डॉ.अमित पाटील, शेतकी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी, सरपंच वसंत वसावे, माजी जि.प.सदस्य कपिलदेव चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.तृप्ती पटले, प्रा.डॉ.दिनेश खरात, रविंद्र चौधरी, रवी पाडवी, सरला पाडवी, सिंधु वसावे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आमदार आमश्या पाडवी पुढे म्हणाले की अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात कुपोषणाची मोठी समस्या असुन सर्वांना एकमेकांच्या सहकार्याने या दोन्ही तालुक्यात कुपोषणाचा लागलेला कलंक पुसण्याचे काम करावे लागेल. रुग्णवाहिकेमुळे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे कोणत्याही रुग्णाचा जीव जाऊ नये यासाठी सर्वांनी कृतिशील राहणे गरजेचे असल्याचे सांगत कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे ही सांगितले. या प्रसंगी डॉ.संदीप पुंड, कपिल चौधरी, दिनेश खरात, रविंद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक धडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.कांतीलाल पावरा यांनी केले. कार्यक्रमात आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुवा तालुक्यातील ब्रि.अंकुशविहिर, वाण्याविहीर, गव्हाळी, ओहवा, उर्मिलामाळ, वडफळी, खापर, व अक्कलकुवा तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय,असे ९ तर धडगाव तालुक्यातील राजबर्डी, सोन, मांडवी, धनाजे, खुंटामौळी, व धडगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय या ६ ठिकाणी असे एकुण १५ रुग्णवाहिकेंचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सरपंच, ग्रामस्थ व वैद्यकीय अधिकारी आदीं उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन नगरकर यांच्या सह कर्मचारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments