Header Ads Widget


डंपरने रिक्षाला मागून जबर ठोस दिल्याने एक जण जागीच ठार, तर सहा जण जखमी

 






अक्कलकुवा प्रतिनिधी/शेख इलियास:
13 जून 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर राजमोही फाट्याजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने रिक्षाला मागून जबर ठोस दिल्याने एक जण जागीच ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली असून डंपर चालकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जून 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर राजमोही गावाजवळ डंपर क्रमांक एम एच 39 एसी 5747 याने आप्पे रिक्षा क्रमांक जी जे 22 व्ही 0796 हिला मागून जबर ठोस दिल्याने कोयली विहीर येथील मयत शंभू ओल्या नाईक हा सोमावल येथे आपल्या मुलीकडे जात असलेला वृद्ध जागीच ठार झाला असून अनिता जेंद्रा वळवी अतुल जेंद्रा वळवी रा. अंमलपाडा हे मायलेक लालसिंग मोत्या तडवी, महेंद्र मोत्या तडवी, रमिला लालसिंग तडवी, शेमट्या वेत्रा तडवी सर्व रा. गदवाणी हे जखमी झाले आहेत. जखमींवर अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक औषधोपचार करून अत्यवस्थ रुग्णांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत डंपर चालका विरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र जाधव करीत आहेत.अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर अक्कलकुवाकडून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर डंपर वाळू तसेच खडी दररोज वाहून नेत आहेत हे डंपर भरधाव वेगाने धावत असून अपघातास कारणीभूत ठरत आहेत, अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावर देखील दररोज मोठ्या संख्येने डंपर रेती तसेच खडी व इतर बांधकाम साहित्य वाहून नेत आहेत या मार्गावर धावणारे डंपर देखील भरधाव वेगाने धावत असल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी या मार्गावरही डम्परने चार चाकी वाहनाला जबर ठोस देऊन एक जन मृत्युमुखी तर काही जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या भरधाव वेगात धावणाऱ्या या डंपर्सवर परिवहन विभाग का कारवाई करत नाही ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. रेती, खडीसह बांधकाम साहित्य वाहून नेणारे डंपर क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेत असल्याने राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची डोळे झाक करून आपले लक्ष गाठण्यासाठी चालक रस्त्यावर भरधाव वेगाने सुसाट जात असल्याचे नित्याचेच आहे. सदर अपघातात रिक्षाला मागून ठोस देणारा डंपर जुना होता मात्र पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलेला डंपर नवा असल्याने अपघातातील डंपर बदलण्यात आला आहे अशी चर्चा असून अपघातग्रस्त डंपर का बदलण्यात आला ? याबाबत पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments

|