Header Ads Widget


श्री. नितीन गडकरी पंतप्रधान होण्याची शक्यता:(लक्ष्मण हिरालाल कदम शहादा)

 

     



मा. नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा, देवेंद्रजी फडणवीस, नितीशकुमार आणि अरविंदजी केजरीवाल ह्या पंचांनीच भारताच्या राजकारणाला अत्यंत घाणेरड्या स्वरूपाचा वळणावर आणून ठेवलेले असल्याने, देशाचे राजकारण हे पूर्णपणे अविश्वसनीय आणि नितीमुल्यांचा, सिद्धांताचा खून होऊन केवळ स्वार्थासाठी खोटे आणि बनवाबनवीचा प्रकाराने चालणारा हा राजकारणाचा तिरस्कारणीय द्वेषमुलक नंगानाच आणि बेशरमपणाची मर्यादा शिल्लक राहिलेली नसल्याने 2024 मधील लोकसभेच्या निवडणुका ह्या तेवढ्याच बेभरोशाच्या आणि अविश्वसनीय स्वरूपाच्या रहाणाऱ्या आहेत. 'अशा एकंदरीत गोंधळाच्या वातावरणातून श्री नितीनजी गडकरी यांनाच पंतप्रधान बनविण्याचा एक मध्यस्थ मार्ग जन्माला आला तर विशेष आश्चर्य वाटू नये.' मुळातच कोणत्याही राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांचा जनतेवर मुळीच विश्वास आणि भरोसा नाही. वंशपरंपरागत नेते, गर्भ श्रीमंत कोण? कारखाने, बँका, शिक्षणसंस्था, उद्योग सम्राट कोण? ठिकठिकाणचे जातीनिहाय प्रभावी पुढारी कोण? अशा पद्धतीच्या सत्ताधीश, भ्रष्ट, गर्भश्रीमंत आणि आर्थिक, दहशतवादी व्यक्तीवरच भरोसा आणि विश्वास ठेवून राज्य कारभार करण्याचा, चालवण्याचा पद्धतीमध्ये जनमताचे महत्वच शिल्लक राहिलेले नाही. 

     मोदीजींनी स्मार्ट सिटी बनवलेल्या शहरांची नावे जाहीर करावीत. खासदारांनी दत्तक घेतलेल्या आदर्श गावांची नावे सांगावीत. प्रत्येक घरात शौचालय आहेत अशा जिल्ह्यांची नावे सांगावीत. नवीन रुग्णालय सुरू असलेल्या जिल्ह्यांची नावे सांगावीत. बँकेच्या शाखेत जनधन खाती जिवंत आणि कार्यान्वित आहेत हे दाखवून द्यावे. भारतात गुंतवणूक करणाऱ्या देशांची दोन आकडी संख्या दाखवून द्यावी. अशी क्षेत्रे दाखवून द्या जेथे 1 लाख नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत. नवीन वीज निर्मितीचे प्रकल्प उभारलेल्या राज्यांची नावे दोन आकड्यात दाखवा अगर सांगा. सरकारी शाळेत शिकणाऱ्या मंत्र्याच्या मुलांची नावे जाहीर करा. शहरे पूर्वीपेक्षा अधिक पटीने स्वच्छ झालीत काय? शेतकरी आत्महत्या थांबल्यात काय? भाजपच्या एखाद्या नेत्याच्या दुकानावर ईडीचे छापे टाकून काळा पैसा जप्त करण्यात आला काय? बलात्कार करणाऱ्या भाजपचे किती नेते तुरुंगात आहेत? नवीन सिंचन योजनांचे बांधकाम झालेले जिल्हे किती? विद्युतीकरण झालेले राज्य किती? भ्रष्टाचार समाप्त झालेला एखादा विभाग सांगाल काय? कोणताही डाग नसलेल्या भाजप खासदार, आमदारांची नावे दोन अंकी तरी आहेत काय? महिला सुरक्षित असलेले राज्य किती? नवीन हवाई पट्टी बांधली गेली असे राज्य दोन आकडी तरी आहेत काय? देशातील पैसा घेऊन परदेशात पळून गेलेल्या थकबाकीदारांना पकडून देशात परत आणले आहे असे एकाचे तरी नाव सांगा? आणि देशातील सरकारी संपत्ती लुटणाऱ्या कोट्याधीशांशी भाजपचे संबंध नाहीत असा दावा भाजप करू शकेल काय? नोटबंदीच्या काळात भाजपचे किती आमदार, खासदारांना रांगेत उभे राहावे लागले? वर्षभरात सीमेवर गोळीबार झालाच नाही असा दावा सरकार करू शकेल काय? पंतप्रधानाचा परदेश दौरा 1 कोटी रुपयांपेक्षा कमी खर्च झाला आहे असा एखाद्या दौऱ्याचे नाव सांगाल काय? भाजपने घराणेशाहीच्या आधारे खासदार आणि आमदारांना तिकीट दिले नाही अशा एखाद्या राज्याचे नाव सांगाल काय? पंतप्रधानांनी चीनला आवाहन दिलेले एक तरी भाषण आठवते काय? जिथे भाजपने कोट्यावधी रुपये देऊन आमदार विकत घेतले नाहीत अशी 9 राज्य सांगा आणि पंतप्रधानांनी केवळ विकासाचे नावावरच प्रचारादरम्यान मते मागितली अशा राज्याची नावे सांगा? हिंदू मुसलमान एवढाच धार्मिक वाद ज्वलंत ठेवून आणि श्रीराम, श्रीकृष्ण, काशी विश्वेश्वर मंदिराला न्याय मिळवून देऊन काश्मीरमधील 370 कलम हटवून, एन आर सी व सी.ए.ए. (C.A.A.) कायदा करून विकासाला पोतडीत गुंडाळून 'सब समाज को लिये साथमे आगे है बढते जाना' हे ब्रीद वाक्य विसरून मोदी शहा यांची मनमानी देश पहातो आहे. अनुभवतो आहे.

     महाराष्ट्रातील राजकारणात तर घरफोडी झाली, पक्षफोडी झाली, राजकीय पक्षांचे चिन्ह आणि नावे चोरून नेण्यात आली. आमदार, मंत्र्यांना पळवून नेण्यात आले. 50 खोके आमदारांना देऊन आणि ईडी, सीबीआयची धमकी देऊन त्यांना भाजप पक्षात सामील करून आमदार, खासदारकी बहाल करण्यात आली. त्यांच्या साखर कारखान्याला हजारो करोडोंचे अनुदान देऊन उलट त्यांचा कोट्यावधीचा आदर्श भ्रष्टाचाराला क्लीनचीट देऊन त्यांना मंत्रिपदे सुद्धा देण्यात आली. महाराष्ट्राचा राज्यपालांची सुद्धा मदत घेऊन इतकेच नव्हे तर सभापतींचा वापर करून निवडणूक आयोगालाही हाताशी धरून विरोधी पक्षाला संपविण्याचे षडयंत्र आणि कट, कारस्थान रचण्यात आले. सुप्रीम कोर्टाचे आदेशाची दिशाभूल करण्याची आणि विलंबाने सुद्धा न्याय न देण्याची हिंमत दाखवण्यात आली. राजकारण अत्यंत घृणास्पद आणि तिरस्कारणीय झालेले असून बुद्धीभ्रष्ट करण्याचे आणि पप्पू म्हणून हिणवण्याचे बालिशपणाचे आणि तेवढेच गुंडा प्रवृत्तीची अश्लील भाषेचे टीकाटिप्पणी करण्याचे द्वेषमूलक राजकारण नारायण राणे, निलेश राणे, छगन भुजबळ या वाह्याद नेत्यांनी करून टाकले. खुद्द पंतप्रधानांच्या जाहीर सभांमधून मंगळसुत्र, मटन, मासे, मुस्लिम समाजाला घुसखोर, अधिक मुळे असणारे अशा शब्दांची आणि विचाराची भाषा महाराष्ट्राची सुसंस्कृत संस्कृती, संतांचा आणि वारकऱ्यांचा महाराष्ट्र या राजकारणांनी बदनाम करून टाकला हे सत्य नाकारून चालणार नाही. नंदुरबार लोकसभेतील इंदिरा काँग्रेसच्या उमेदवाराबाबत आदिवासी विकास मंत्री विजय गावित हे त्याला 'उपऱ्या टपऱ्या' म्हणून उल्लेख करतात तर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आणि मंत्री नामदार गिरीशजी महाजन यांच्या रगारगात अहंकाराने एवढे उंचीवर पोहोचले आहेत की त्यांना आता आकाश ठेंगणे पडू लागले आहे. या सर्वांचे पाठीराखे नामदार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाटते की महाराष्ट्रात कोणत्याच राजकीय पक्षाच्या पुढार्‍यांना अक्कल, बुद्धी शिल्लक नाही. आणि जनता मी सांगेल त्यावरच विश्वास ठेवतील म्हणूनच 'मैं समंदर हूॅं मेरा पाणी कम देखकर घर बांध मत लेना, मैं फिर लौटकर आऊंगा' अशी भाषा आत्मविश्वासाची नसून मगुरीची असल्याने राजकारणातील सभ्यता, माणुसकी, निष्ठा, सिद्धांत या समुद्राच्या भरती ओहोटी मध्येच तरंगताना दिसत आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याचे कामाचे स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते जल पुजनाचा जाहीर कार्यक्रम होऊन आणि कोट्यावधी रुपयांचा खर्च होऊन सुद्धा या संदर्भातील काम शून्य असून, कोट्यावधीचा केवळ भ्रष्टाचार आणि गैरवापराचा प्रकार भाजप आणि भाजप नेत्यांचे शिवस्मारका प्रतीची ही आस्था आणि अभिमानाची बाब समजावी काय? छत्रपतींचा नावाचा वापर हा दिखाऊ समजावा काय? मग भाजप आणि काँग्रेस यामध्ये फरक काय? यालाच मोदींची गॅरंटी म्हणून ओळखायचे काय? मोदींची गॅरंटी मात्र भाजपची गॅरंटी नाही, म्हणजेच व्यक्तीनिष्ठ भाजप झाल्याचा हा ठोस पुरावा नाही काय? यालाच 'केडरबेस पार्टी' म्हणून संबोधावे काय? ज्यांना तुरुंगात ठेवायचे होते त्यांना मंत्रिमंडळात मंत्रीपदे देऊन आमदारकी, खासदारकी देऊन आणि त्यांच्या कारखान्यांना, संस्थांना कोट्यावधीचे अनुदान देऊन त्यांना भाजप पक्षात सामील करून अथवा त्यांना मित्रपक्ष बनवून जी नवीन पद्धत राजकारणात दिसून येत आहे ह्याच राजकारणाला निर्लज्ज्ञपणाचे आणि ढोंगीपणाचे राजकारण स्वार्थासाठी सत्तेसाठी मेंदूच नव्हे शरीराचे सर्वच अवयव बदलून नवा माणूस घडवण्याचा अगर दाखवण्याचा हा प्रयोग आणि वॉशिंग मशीन आता जनमाणसाच्या घृणेला पात्र ठरत चालले आहे. हिंदुत्व, श्रीराम मंदिर, काश्मीर प्रश्न, सोडविण्याचा अभिमान आणि पश्चिम बंगाल, केरळ मधील विदारक परिस्थिती बदलण्यासाठी देशातील 75 टक्के जनता भाजपच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असतांना, भाजपच्या नेत्यांचाच जनतेवर आणि जनमतावर विश्वास नसल्याने त्यांनी सर्वपक्षीय भ्रष्टाचारी नेत्यांना अभयदान देत त्यांना भाजप पक्षात सामावून घेण्याचा हा प्रकार म्हणजेच जनमतावर विश्वास नसल्याचा सबळ पुरावा असून, त्यामुळे भाजपची स्वच्छ आणि राष्ट्राभिमानी, धर्माभिमानी प्रतिमेला मोठ्या प्रमाणावर गालबोट लागून शक्तिशाली भाजप शक्तीहीन बनत जात आहे, असे एकूण चित्र आहे. इलेक्ट्रोर बाॅन्डचा आर्थिक भ्रष्टाचार आणि पैशांसाठी लुटमारीची सिद्धांतहीन पद्धत ही खुपच लाजिरवाणी आहे. गोमांस निर्यात करणाऱ्या कंपनीकडून जर अशा पद्धतीने भाजपने पैसा स्वीकारला असेल तर हे लांछनास्पदच नाही तर जगण्यापेक्षा मरण चांगले अशातलाच हा प्रकार आहे. तसे असेल तर गाईला गोमाता म्हणण्याचा हक्क व अधिकार भाजपने गमावलेला आहे. ही चूक लहानशी नसून पहाडाएवढी आहे, आणि हिंदू संस्कृतीला लाजवणारी कृती आहे. तर मणिपूरमध्ये महिलेला पूर्णपणे निवस्त्र करून तिची लज्जास्पद पद्धतीने धिंड काढली गेली हा प्रकार कोणत्याही धर्माला शोभणारा नाही. सदरची महिला कारगिल युद्धातील सैनिकाची पत्नी होती म्हणूनच हे निषेधात्मक कृत्य होते एवढी सिमित आमची विचारधारा अगर दृष्टिकोन नसावा, तर देशद्रोही कृत्य करणारी अगर चीन/पाकिस्तानची सुद्धा महिला असती अगर गुप्तहेर असली तरी तिला अशा पद्धतीने निवस्त्र करून धिंड काढण्याचा हा प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला काळे फासणारा असल्याने, आमच्या देशाचे राजकारण एवढ्या अधोगतीला उतरून करण्याची पद्धत ही माणुसकीहीन आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदूवर अन्याय होतो, महिलांवर अन्याय होतो ममता बॅनर्जीचे सरकार हे न्याय देऊ शकत नाही, म्हणून घटनेचे 356 कलम वापरून ते सरकार बरखास्त करा तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा मात्र ममता बॅनर्जीचे चोचले पुरवत अंतर्गत अन्याय अत्याचार धुमसत ठेवून त्याचे धार्मिक राजकारण करून देशात विषमतेची ज्वाला पेटवण्याचा प्रकार हे क्षणिक सुख आहे. भविष्याच्या मात्र हा चुकीचा अंधकारमय खेळ आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री, अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आप पक्षाचे नेते खासदार संजयसिंग ही मंडळी निश्चितपणे भ्रष्ट आहेत. मुस्लिम तृष्टिकरणवादी आहे. ते आंतरराष्ट्रीय गुन्हेगार सुद्धा असू शकतात. साधी राहणीमान दर्शवणारी ही मंडळी ठकसेन प्रवृत्तीची आहेत. यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा फायदा घेऊन दिल्लीला लुटत आहेत. यांनी दारूचा घोटाळा आणि यांचे हवाला प्रकरणात यांची इभ्रत संपवलेली असली तरी, द्वेषाने प्रेरित कारवाई करून ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून सबळ पुरावे प्राप्त न करता त्यांना तुरुंगात टाकण्याची व खैबर खिंडीत पकडण्याची पद्धत भाजपची विश्वासार्हता संपवणारी आणि सत्तेचा दुरुपयोग करणारी दिसू लागली आहे. विशेष निषेधार्ह बाब म्हणजे ह्या मद्यव्यवहार घोटाळ्याशी निगडित मंगुटा रेड्डी व त्यांचा पुत्र राघव मगुंटा रेड्डी यांच्याकडून इलेक्ट्रोल बाॅन्डचे माध्यमाने आधी 5 व नंतर 50 अशा पद्धतीने 55 कोटीची मदत भाजप पक्षाला मिळाली, त्यामुळे शरद रेड्डींना जामीन मंजूर होते व त्याला माफीचा साक्षीदार सुद्धा बनवले जाते, हा प्रकार आणि पद्धत भाजप सारख्या राष्ट्रभक्त पक्षाला आणि मोदी शहा यांना तरी पटतं काय? न्यायाप्रती, सिद्धांताप्रती, आदर्शाप्रति ही गद्दारी नाही? चंदीगड महापौर निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्याने अल्पमताच्या भाजप उमेदवाराला विजयी घोषित करण्यासाठी आठ मतदान पत्रिका बाद करण्यासाठी मतपत्रिकेवर छेडछाड करण्याचे गैरकृत्य ही कोणती लोकशाही आहे? निवडणूक आयोगाने सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अगर शिवसेना यांची आमदारांची, खासदारांची संख्या बघून पक्षांचे नाव आणि चिन्ह बंडखोरांना देऊन राजकीय पक्षांचा मुडदा पाडण्याची ही पद्धत लोकशाहीला लाजविणारी नाही? महाराष्ट्राचे विधानसभेचे सभापती एडवोकेट राहुल नार्वेकर यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि निर्देशानुसार न वागता मनमानी आणि पक्षपातीपणाचा निर्णय देणे शिवाय अशा चुकीचा निर्णय देण्यासाठी सुद्धा चालढकल करून विलंबाने एक मजबुरी म्हणून निर्णय देणे, अशी न्यायव्यवस्था असेल तर देशाचे कसे होईल? महाराष्ट्राचे राज्यपालांनी 12 आमदारांचे प्रकरण अजूनही गुलदस्त्यात गुंडाळून ठेवलेले आहे. महाराष्ट्राचेच नव्हे तर तामिळनाडूचे राज्यपाल सुद्धा अशाच तऱ्हेने मंत्रीपदाची शपथ देण्याचे कार्यपद्धतीमध्ये पक्षपाती भूमिका वठवतात. राजकारण कोणत्या दिशेला जात आहे ही तर दादागिरी आणि हुकूमशाहीचीच मनमानी पद्धत समजावी लागेल? किरीट सोमैय्या सारख्या कार्यकर्त्याला, नेत्याला, माजी खासदाराला सुद्धा एकटे लढवून आणि त्यांना मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे आदेश देऊन पक्ष आदेश म्हणून त्यांना छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, भावना गवळी, नवाब मलिक, अशोक चव्हाण अशा डझनभर माजलेल्या भ्रष्ट हत्तीच्या विरोधात लढविण्यात आले आणि या सर्व भ्रष्टाचाऱ्यांना मंत्रिमंडळात घेऊन सन्मानाची पदे देऊन त्यांचा भ्रष्टाचारांवर गंगाजल शिंपडून, वॉशिंग मशीन मधून स्वच्छ करून त्यांना पुन्हा कोट्यावधी रुपयांची मदत, अनुदान आणि सत्ता देऊन किरीट सोमैय्या यांचेवर महाराष्ट्राने हसावे आणि सोमैय्याने आयुष्यभर लाजिरवाणे जीवन जगावे हीच भाजपची व भाजप नेत्यांची आदर्श आणि विश्वासार्ह नीती समजावी काय? यालाच देशाभिमानी आणि हिंदू संस्कृतीचा आदर्श म्हणून ओळखावा काय? हत्येला वध संबोधावे, माफीला स्ट्रेटेजी म्हणून ओळखावे, हप्ता वसुलीला बाॅन्डचे स्वरूप द्यावे, जुमल्यांना गॅरंटी म्हणून स्वीकारावे हीच काय आता भाजपची नवी राजनीती म्हणून ओळखून कार्यकर्त्यांनी वागावे अशीच भाजप नेत्यांची रणनीती आहे काय? विरोधकांना संपवण्यासाठी अगर त्यांना भाजपमध्ये येण्यासाठी बाध्य करणारी अगर त्यांना मित्रपक्ष म्हणून बनवण्याची ही राजकीय पद्धत पूर्णपणे चुकीची आणि फसवी आहे. उलट अजित पवार, छगन भुजबळ, हर्षवर्धन पाटील, अशोक चव्हाण, अगर एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आमदार व खासदार यांना भाजपमध्ये सामील करून अगर मित्र पक्ष बनवून सत्तेसाठी ईडीचा आणि सीबीआयचा वापर करून पक्षाची वाढ अगर सत्तेची शाश्वती आणता येते हे तंत्र चुकीचे आहे. 75 टक्के सहानुभूती आणि पाठींबा असलेल्या जनमताला उल्लू बनवण्याचा हा प्रकार व तंत्र जनमताला गोंधळात टाकून आणि जनमताची सहानुभूती नष्ट होऊन नेते सांभाळण्याची पद्धत चुकीची आणि घातक आहे. हा प्रकार 400 पारचा तर नाहीच मात्र बहुमत टिकवण्यासाठी सुद्धा करावी लागणारी तारेवरची कसरत ठरू नये म्हणजे झालं. जनमता ऐवजी पुढाऱ्यांवरच विश्वास ठेवण्याचा हा खेळ देवेंद्र फडणवीस आणि मोदी व शहा यांना महागात पडण्याचा धोका सुद्धा आहे. निवडणुकांचे तोंडावर आता पुन्हा तावडे, पंकजा मुंडे, एकनाथजी खडसे यांना हाताशी धरून राजकीय खेळ सावरण्याची नामुष्की देवेंद्र फडणवीस, गिरीशजी महाजन यांनाच नव्हे तर मोदी, शहा यांच्यावर सुद्धा यावी म्हणूनच नितिशकुमार सारखे नेते पुन्हा गळाला लावण्याची वेळ यावी हाच भाजप सरकारचा मोठा पराभव आहे. 75 टक्के जनता भाजपच्या मागे असतांना पुढारी नेते आणि तेही भ्रष्टाचारी व अहंकारी आणि स्वार्थी व दुटप्पी पलटूराम यांना जवळ करणे या गोष्टी शहाणपणाच्या नाहीत. 10 वर्षाची सत्ता हातात असताना व 75 टक्के जनता सोबत असतांना असे घाणेरडे राजकारण जनतेला मान्य नाही. भाजपची अंधभक्त नावाची नवीन जात आणि सरकारची अशी असरकारी फौज असणं हे नवीन राजकारण आहे. कोणतेही सरकार काही अमरपट्टा घेऊन येत नाही. ते सरकार सत्तेत नसेल तेव्हा अशा अंधभक्त फौजेचे काय होणार? सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हिंदू, पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री हिंदू अशी वास्तवता असतांना हिंदू खतरेमे, काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत, भाजपा हारी तो हिंदू खत्म, भाजपा हारी तो ...... कटी असा धार्मिक उन्मादाला आयटी सेलच्या प्रचाराला व भाजप नेत्यांना विचारावेसे वाटते की 10 वर्षापासून सत्ता असतांना समान नागरी कायदा अगर लोकसंख्या नियंत्रण कायदा कां होऊ शकला नाही? गोवा, नागालँड, मणिपूर, मिझोराम येथे सत्ता असून सुद्धा गोहत्या बंदी कायदा करू शकले नाही. त्यांनी केरळ, बंगालची सत्ता मिळवली तरी ते असा कायदा करू शकतील यावर विश्वास ठेवता येत नाही. मध्यप्रदेश मध्ये आदिवासी तरुणावर भाजपच्या नेत्याने लघवी केली आणि कारगिल युद्धात लढणारा सैनिक योद्धा म्हणतो मी देशाचे संरक्षण करू शकलो मात्र मणिपुर मध्ये माझ्या पत्नीची इभ्रत वाचवू शकलो नाही. त्या आदिवासी महिलेची निवस्त्र धिंड निघाली हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श संस्कार आणि नितीचा पराभव नाही? हे भाजपची सत्ता असलेल्या राज्यात होऊनही जगातील सर्वात शक्तिशाली नेता व पंतप्रधानांनी त्याठिकाणी भेट देऊ नये अगर राष्ट्रीय स्तरावरून या घटनेचा निषेध व्यक्त करून साधी माफी मागू नये याला अहंकार आणि गर्व म्हणू नये तर काय म्हणावे? कर्नाटक मधील हासन लोकसभेचे उमेदवार बलात्कारी प्रज्वल रेवन्ना यांची लैंगिक शोषणाचे हजारो व्हिडिओ असतांना त्याचेशी मैत्री करावी हा भाजपची सत्तेसाठीचा हव्यास समजावा काय? काँग्रेस सत्तेवर आली तर मंगळसूत्र विकण्याची वेळ येईल असे विचार पंतप्रधानाच्या पदाची गरिमा कमी करणारी आहे. आणि हिंदुत्वाचे भुषण सांगणाऱ्या भाजपने आंतरवाली सराटी मधील शांततामय चालणाऱ्या मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्यासाठी त्यांच्यावर लाठीहल्ला आणि गोळीबार करावा. महिलांवर अत्याचार करावे ही भाजपची फडणवीस निती यालाच हिंदुत्व संबोधावे काय?  

मराठा आंदोलन, शेतकरी आंदोलन राष्ट्रद्रोही मात्र गोमांस निर्यात करणाऱ्या कंपनीकडून करोडो रुपयांची देणगी घेणारे भाजप नेते राष्ट्रभक्त. भाजपला मत देणारे हिंदू आणि भाजप विरोधात मतदान करणारे अहिंदू, राष्ट्रद्रोही हा समज भाजपने काढून लवकरात लवकर आत्मचिंतन करून सुधारणा करावी असे सांगतांना प्रचंड महागाई आणि शेतकऱ्यांचा उग्र संताप भाजपला दिसू नये अगर कळू नये आणि राजकीय पक्ष व चिन्ह आपलेच पूर्वीचे विचार, सिद्धांत, गाडून आणि जाहीर सभांमधून व्यक्त केलेले विचार गहाण ठेवून सत्ता मिळवण्याचा हा प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांनाच नव्हे तर आम जनतेला रुचलेला नाही. पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक पूर्व मतदार नोंदणीसाठी भाजपचे कार्यकर्ते घरोघरी, कार्यालयात, दुकानात जाऊन पदवीधारकांचे सर्टिफिकेट घेऊन नाव नोंदणी फार्म भरून मतदानाचे दिवशी त्यांचेशी संपर्क करून तसेच विधानसभा/लोकसभा निवडणुकीचे वेळी घरोघर संपर्क करून जनमताचा विश्वास प्रामाणिक भावनेने मिळवणाऱ्या जुन्या संघर्षमय कार्यकर्त्यांना मोदी लाटेने मोठे केले नाही तर काँग्रेसचेच पुढाऱ्यांना फोडून त्यांना सत्तेवर बसवले हा राजकारणाचा खेळ भाजपच्या विश्वासाला, भविष्याला संघटनेला मोठा मारक ठरणारा आहे. स्व. उत्तमरावजी पाटील, प्रा.ना.स. फरांदे, प्रतापरावजी सोनवणे अशा नेत्यांनी घडविलेला पदवीधर मतदार संघ भाजपला काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन निवडण्याची लांच्छनास्पद वेळ यावी यातच भाजपने दिखाऊ आणि सत्तेच्या स्वार्थापोटी भ्रष्टाचार प्रवृत्तीला आलिंगन करणारी त्यांची पद्धत, आता नव्याने भाजपला प्रामाणिक ध्येयवादी आणि सिद्धांतवादी कार्यकर्ते मिळवून देईल हे सांगणे कठीण आहे. अटलजी म्हणत होते 'हमारा एक भी पुराना कार्यकर्ता टुटना नही चाहिए नए चाहे 10 तुट जाए| क्योंकि पुराना कार्यकर्ता हमारी जीत की गारंटी है और नऐ कार्यकर्ता पर विश्वास करना जल्दबाजी है||' येथे तर सन्माननीय लालकृष्ण अडवाणीजी, मुरली मनोहर जोशी यांना तर दुधातून माशी काढून फेकावी त्याप्रमाणे सुरुवातीलाच बाजूला सारून देशभरातील कार्यकर्त्यांना कुजवून टाकण्यात आले आहे. आणि काँग्रेसमुक्त भारत करत असतांना काँग्रेसयुक्त भाजप बनलेला देश पहातो आहे. आणि म्हणूनच निराशापोटी मा. नरेंद्रजी मोदी यांनी नंदुरबारच्या सभेत श्री शरदरावजी पवार आणि उद्धवजी ठाकरे यांना त्यांच्या जुन्या पक्षात सामील होण्याचे आवाहन करतात ही पराभवाची अभिव्यक्ती नाही? या सर्व परिस्थिती नंतर नंदुरबारच्या सभेत श्रीमती प्रियंका गांधी यांनी मुद्देसूदपणे आणि विचारवंतांना सुद्धा विचार करण्यास बाध्य करील असे दमदार, जोरदार, अत्यंत बुद्धिवादी आणि प्रतिष्ठितपणाचे भाषण ऐकून तर त्याच दिवशी काँग्रेस उमेदवाराचा विजय निश्चित होऊन गेला. म्हणूनच 2024 मधील निवडणूक ही अबोल वाटणारी असली तरी जनतेचा अंतरमनात संताप, घृणा असल्याने अदृश्य स्वरूपातील क्रांतिकारी स्वरूपाची ही निवडणूक ठरण्याची शक्यता असून बहुमत कोणत्याच पक्षाला नाही, महाराष्ट्रात तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटाचे सर्वच उमेदवार पराभूतच करण्याचे जनमत असून भाजपच्या संदर्भाने सुद्धा राग, संताप असून देवेंद्रजी फडणवीस यांनी राजकारणात केलेला गोपालकाला जनतेला मान्य नसल्याने फडणवीस नितीचा पराभवासाठी मतदारांनी पूर्वीपासून अंतर्मन बनवून ठेवलेले असल्याने भाजपला सुद्धा अनेक ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले तर नवल वाटू नये. अशा एकूण राष्ट्रीय स्तरावरील राजकीय परिस्थिती ही त्रिशंकू झाली तर सर्वमान्य आणि मध्यस्थ मार्ग म्हणून 'श्री नितीनजी गडकरी' यांचे नेतृत्वाखाली सर्व समावेशक असे सरकार निर्मितीच्या हेतूने पंतप्रधान बनण्याचा योग जर श्री नितीनजी गडकरी यांना आला तर आश्चर्य वाटू नये.



Post a Comment

0 Comments

|