Header Ads Widget


पिंपळनेर नगरपरिषद अॅक्शन मोडमध्ये;अतिक्रमणधारकांना पुन्हा ७ दिवसांची मुदतवाढ.

साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: साक्री तालुक्यात नव्याने स्थापन झालेली पिंपळनेर नगरपरिषद अॅक्शन मोडमध्ये आली असून नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद आवारातील १३ अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत १३ मार्चला पहिली नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनतर पुन्हा २८ मार्च रोजी दुसरी नोटीस बजावण्यात आली.७ दिवसांत अतिक्रमणधारकांनी स्वतः अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानुसार या भागातील काही अतिक्रमण धारकांनी बुधवारी सकाळपासून स्वतः अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. तर आम्हाला मुदत वाढवून मिळावी अशी विनंती अतिक्रमण धारकांनी केल्याने दरम्यान बुधवारी पुन्हा ९ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे .नगर परिषदेमार्फत देण्यात आलेल्या अंतिम नोटीसमध्ये म्हटले आहे की, पिंपळनेर नगर परिषद हद्दीतील नगर परिषद इमारतीसमोर सटाणा रोडलगत नगर परिषदेच्या पूर्वपरवानगीशिवाय अनधिकृतपणे दुकाने सुरू करून अतिक्रमण केलेले आहे असे करण्यास महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १७९ अन्वये प्रतिबंध करण्यात आलेला आहे. वेळोवेळी आपणास नोटीस देऊन अतिक्रमण काढून घेण्याबाबत कळविलेले होते. तरी देखील आपण आपले अतिक्रमण काढून न घेतल्याने बुधवारी सकाळी नगरपरिषदेने कारवाईस सुरुवात केली असताना अतिक्रमण धारकांनी त्यास विरोध दर्शवून मुदत मागितलेली आहे. त्यानुसार सदरील ठिकाणी आपण करीत असलेला व्यवसाय तात्काळ बंद करून दि.९ एप्रिल पूर्वी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घ्यावे असे न केल्यास सदरील मुदतीनंतर नगरपरिषदेमार्फत कोणतीही पूर्वसूचना न देता कोणत्याही क्षणी अतिक्रमण हटविण्यात येईल व त्यासाठी येणारा खर्च हा अतिक्रमण धारकांकडून वसूल करण्यात येईल तर कार्यवाहीस कोणत्याही प्रकारचा विरोध केल्यास आपणावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल असा इशारा पिंपळनेर नगर परिषदेचे प्रशासक दिपक पाटील यांनी नोटिसीद्वारे दिला आहे. यावेळी पिंपळनेर नगर परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन तळ ठोकून उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|