Header Ads Widget


शहादा शहराचे तापमान ४३ डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याने शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे : शहादा शहरासह परिसरात उष्णतेच्या पारा वाढल्याने नागरिक श्रमिक वर्ग व शेतमजूर हैराण झाले असून वाढत्या तापमानामुळे दिनांक १८ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता शहादा शहराचे तापमान ४३ डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याने शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. उन्हामुळे ठिकठिकाणी वर्दळ कमी दिसून आली. हवामानाच्या अंदाजानुसार साधारणता तीन ते चार दिवस उष्णतेची लाट असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्याच एक भाग म्हणून गेल्या दोन दिवसापासून सूर्य आग ओकत आहे. नागरिकांच्या जीवनमानावर मोठा परिणाम झालेला आहे. सकाळी ११ वाजेनंतर नागरिक घरातच राहणे पसंत करतात. सायंकाळी ६ वाजेनंतर घराबाहेर पडतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शहादा शहरातील जनता चौक, काशिनाथ सजन मार्केट, पुरुषोत्तम मार्केट, शासकीय विश्रामगृह परिसर, बस स्थानक परिसर, चार रस्ता या भागात सातत्याने असलेली वर्दळ दुपारी बारा वाजे नंतर दिसत नाही. मुख्य रस्त्यांवरती वाहनांची संख्या देखील कमी दिसून येते. रस्त्यांवर व चौका चौकात शुकशुकाट होतो.शीतपेयांच्या दुकानावर नागरिकांची काहीशा प्रमाणात गर्दी दिसते. बस स्थानक आवारात देखील प्रवाशांच्या गर्दीवर परिणाम झालेला दिसून आला. भाजी मार्केटमध्ये कमालीची शांतता होती.

     सकाळी दोन ते तीन तास ढगाळ वातावरण होते. सकाळी दहा वाजे नंतर मात्र तापमानाचा पारा वाढला. शेतमजूर शेतांमध्ये सकाळी लवकर शेतात जाऊन दुपारी बारा वाजेपर्यंत कामे करतात. झाडांच्या सावलीच्या आश्रय घेऊन दुपारी चार वाजेनंतर पुन्हा कामाला सुरुवात करतात. शेती कामाला देखील वाढलेल्या तापमानाच्या फटका बसला आहे. पपई पिके वाचवण्यासाठी शेतकरी वेगवेगळे उपाय करीत आहेत.प्लास्टिकच्या पिशव्या बांधल्या जात आहेत. एकंदरीत वाढत्या तापमानामुळे शहादा शहरातील जन जीवनावर परिणाम झाल्याचे दिसून आले. शहादा ग्रामीण रुग्णालयामध्ये स्वतंत्र उष्माघात उपचारासाठी कक्ष करंजीत करण्यात आलेला आहे. लग्नसराईवर देखील मोठा परिणाम झालेला आहे. साधारणतः सायंकाळीच विवाह सोहळे पार पाडण्यावर नागरिकांचा कल आहे.

Post a Comment

0 Comments

|