Header Ads Widget


नंदुरबार जिल्ह्यात जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा -2, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजनांविषयी ग्रामस्थांमध्ये जलरथाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम...

 





नंदुरबार /प्रतिनिधी


 राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा -2, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजनाविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलरथाना जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. 


              जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागणात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम.डी.धस,भारतीय जैन संघटनेचे डॉ.कांतीलाल टाटीया आदी उपस्थित होते.  ग्रामीण भागात लोकसहभागातून शाश्वत पाणीपुरवठा, गावातील पाण्याचे स्त्रोत शास्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे या उद्देशाने जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा -2, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजना विषयी ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जल रथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. यासाठी नंदुरबार  जिल्ह्यातील ६ तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या ६ जलरथाना आज दि २३.०२.२०२४ रोजी  हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. 

           ग्रामस्थांचा लोकसहभाग वाढवा यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून  राज्यातील 34 जिल्ह्यातील 351 तालुक्यातील गावांमध्ये जल रथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ६ तालुक्यात जल रथाद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार  आहे . गावात जल रथाच्या माध्यमातून ऑडिओ जिंगल्स वाजविण्यात येणार आहे .तसेच  गावात ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात येउन  ग्रामस्थांना माहितीपत्रक दिले जाणार आहेत. तसेच भारतीय जैन संघटनेतर्फे  नियुक्त केलेल्या समन्वयकामार्फत योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. तसेच गावातील जलस्त्रोत, तलावातील गाळ काढण्याची मागणी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी केली तर शासनाच्या पोर्टलवर मागणी तात्काळ ऑनलाईन करण्यासाठी भारतीय जैन संघटना सहकार्य करणार आहे .

            जल जीवन मिशन च्या माध्यमातून गावात पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे या अनुषंगाने उत्तम दर्जाची कामे ग्रामस्थांनी करून घ्यावेत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाची कामांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करून गावे स्वच्छ व सुंदर करावीत तसेच जलयुक्त शिवार गाळमुक्त धरण या योजनेतून गावे पाणीदार करावीत असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रमोदकुमार पवार यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments

Today is Sunday, April 27. | 8:57:38 AM