Header Ads Widget


प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी करा - जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित


 नंदुरबार /प्रतिनिधी

 प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना , शबरी आवास योजना, जलजीवन मिशन, व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) व ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या  राज्य व केंद्र शासनाच्या प्राधान्यक्रमाच्या योजनांची वेळेत  अंमलबजावणी करताना ग्रामस्तरावर उद्भवणार्‍या अडचणी तात्काळ सोडवून   योजनांची  प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  डॉ. सुप्रिया गावित यांनी केले. 
      नंदुरबार जिल्हा परिषदेच्या याहा मोगी सभागृहात जिल्हा परिषदेमार्फत ग्रामस्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा व विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांच्या तालुकानिहाय  आढावा बैठका जिल्हा परिषदेचे अध्यक्षा  डॉ. सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या . बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आर. एम. पाटील जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम. डी. धस,  ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर उपस्थित होते. 
       जिल्हा परिषद मार्फत  ग्रामस्तरावर राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) , माझी वसुंधरा अभियान , महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या जनसुविधा सारख्या विविध योजने अंतर्गत सुरू असलेले योजनांचा  आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षा  डॉ. सुप्रिया गावित यांनी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामसेवकांनी दररोज ग्रामपंचायत स्तरावर उपस्थित राहून ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले पाहिजे.  तसेच पात्र लाभार्थी घरकुल, वैयक्तिक शौचालय किंवा इतर वैयक्तिक योजनांच्या लाभापासून वंचित राहता कामा नये यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे.  तसेच सद्यस्थितीत पावसाळा सुरू असून ग्रामस्थाना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे  यासाठी पिण्याच्या पाण्याची प्रयोगशाळेतून तपासणी करणे,टी.सी.एल द्वारे नियमित पाण्याचे शुद्धीकरण करणे , ग्रामपंचायत स्तरावर जीर्ण झालेल्या   सार्वजनिक इमारतीमुळे अनुचित घटना घडू नये यासाठी  ग्रामपंचायतस्तरावर निर्लेखित करावयाच्या इमारतींचे प्रस्ताव तात्काळ  जिल्हा परिषद स्तरावर सादर करण्याच्या सूचनाही अध्यक्षा  डॉ. गावित यांनी दिल्या . 
     यानंतर अध्यक्षा  डॉ. सुप्रिया गावित व मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायतनिहाय  सविस्तर आढावा घेऊन प्रत्येक तालुक्यात ऑगस्ट अखेर 20 गावे हर  घर जल घोषित करण्यासाठी नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या.  यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकाने संबंधित ठेकेदारांकडे पाठपुरावा करून कामे पूर्ण करून घ्यावेत  अशा सूचनाही यावेळी अध्यक्षा  डॉ. गावित यांनी दिला.  
       यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी  सावन  कुमार यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली पाणी पुरवठा योजनेची कामे ,स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेली सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनची  कामे   १०० टक्के पूर्ण करावयाची आहेत. त्या अनुषंगाने ग्रामस्तरावर व पंचायत समितीस्तरावर समन्वयाने नियोजन करण्यात यावे . पाणी पुरवठा योजनेची कामे , सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनची कामे, सार्वजनिक व वैयक्तिक शौचालय कामे व इतर योजनेतून सूरु असलेली  सर्व कामे गुणवत्तापूर्ण करून घ्यावेत. कामे असमाधनकारक व निकृष्ट आढळून आल्यास संबधितावर  कडक कार्यवाही करण्यात येईल . असा इशाराही सावन कुमार यांनी यावेळी  दिला . बैठकीस गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, गटविकास अधिकारी जयवंत उगले,पी. पी . कोकणी, सि. टी.  गोस्वामी , जयेश देवरे , एल.  जे.  पावरा, सर्व विस्तार अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|