Header Ads Widget


अवैध दारूच्या वाहतूकीवर नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई, 46 लाख 05 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत..!!


गुजरात राज्यात दारुबंदी असल्यामुळे महाराष्ट्रातून अवैध दारुची चोरटी वाहतूक होत असते. त्याविषयीच्या तक्रारी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने गुजरात राज्यात अवैधपणे दारुची वाहतूक होणार नाही तसेच अवैध दारुची तस्करी करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होतेे.  

दिनांक 15/05/2023 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, धुळ्याकडून विसरवाडी, नवापूर मार्गे महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात अशोक लेलैंड कंपनीच्या कंटेनरमधून अवैध दारुची चोरटी वाहतूक होणार आहे, त्यावरून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सदर माहिती नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांना देवून नवापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे मिळून एक पथक तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले. 

मिळालेल्या बातमीच्या आधारे नवापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील सुरत ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी हॉटेलजवळ सापळा रचला. धुळे जिल्ह्याकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतांना रात्री 22.00 वा. सुमारास एक अशोक लेलैंड कंपनीचा तपकिरी रंगाचा कंटेनर भरधाव वेगाने येतांना दिसला, म्हणून पोलीस पथकातील अमंलदारांनी हातातील टॉर्चच्या सहाय्याने त्यास उभे करण्याचा इशारा देवून वाहन थांबविले. वाहनातील इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता प्रकाश नरसिंगराम देवासी, वय-26 वर्षे, रा. गंगाणी ता. बावडी जि. जोधपुर (राजस्थान) असे सांगितले. पथकांनी त्यास वाहनात काय भरले आहे ? याबाबत विचारपूस केली असता, वाहनात मेडीको कंपनीचे औषधाचे खोके असून ते अहमदनगर येथून हिमा फार्मसीट्रीकल्स प्रा.लि. अंकलेश्वर, गुजरात येथे घेवून जात असलेबाबत सांगून त्याबाबत बिलाची छायांकीत प्रत दाखविली. वाहन चालकास विचारपूस करीत असतांना तो उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याचे समजून आल्याने पथकांनी वाहन ताब्यात घेवून वाहनाची तपासणी केली असता त्यात खाकी रंगाचे बॉक्स व त्यामध्ये विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या आढळून आल्या. म्हणून सदरचे चारचाकी वाहन विसरवाडी पोलीस ठाणे येथे आणून वाहनाची तपासणी केली असता त्यात खालील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल आढळून आला. 

1) 23 लाख 32 हजार 800/- रुपये किमतीचे Imperial Blue Blender Grain Whisky चे 648 खाकी रंगाचे खोके, त्यात 180 एम.एल.च्या एकुण 31,104 नग काचेच्या बाटल्या. 

2) 3 लाख 88 हजार 080/- रुपये किमतीचे Royal Challange Finest Premium Whisky चे 98 खाकी रंगाचे खोके, त्यात 750 एम.एल.च्या एकुण 1176 नग काचेच्या बाटल्या. 

3) 3 लाख 79 हजार 440/- रुपये किमतीचे Royal Challange Finest Premium Whisky चे 93 खाकी रंगाचे खोके, त्यात 180 एम.एल.च्या एकुण 4464 नग काचेच्या बाटल्या. 

4) 5000/- रुपये किमतीचा एक ओप्पो कंपनीचा मोबाईल.

5) झालानी मेडीकोचे ई-वे बील

6) 15 लाख रुपये किमतीचा एक अशोक लेलैंड कंपनीचा कंटेनर क्रमांक KA-51 B-9974 

असा एकुण 46 लाख 05 हजार 320 रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळून आल्याने कायदेशीर प्रक्रिया करुन सदरचा मुद्देमाल जप्त करुन प्रकाश नरसिंगराम देवासी, वय-26 वर्षे, रा. गंगाणी ता. बावडी जि. जोधपुर राजस्थान खोटे बनावट E-way Bill, Tax Invoce बनवून शासनाचा महसूल बुडवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने चारचाकी वाहनातून गुजरात राज्यात अवैध विदेशी दारु विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आला म्हणून त्याचेविरुध्द् विसरवाडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 204/2023 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 108, सह भा.द.वि. कलम 420, 468 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आलेला आहे.  

सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, पोलीस उप निरीक्षक श्री. भुषण बैसाणेे, पोलीस उप निरीक्षक श्री. मनोज पाटील, सहा. पोलीस उप निरीक्षक युवराज परदेशी, पोलीस हवालदार पंकज पाटील, दिनेश वसुले, राजेश येलवे, पोलीस नाईक किशोर वळवी, योगेश थोरात, अतुल पानपाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, राकेश वसावे, जितेंद्र तांबोळी, जितेंद्र ठाकुर, विशाल नागरे, दादाभाई मासुळ, जितेंद्र तोरवणे, राजेंद्र काटके, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे. 

Post a Comment

0 Comments

|