जालना : जालना शहरात गुरुवारी रामनवमी उत्सवानिमित्त रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीत एका तरुणाची निर्घृण हत्या झाली आहे.राम नवमीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बडीसडक वरील राम मंदिराकडे येत असताना एका तरुणाची भोसकून हत्या करण्यात आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. जुना जालना परिसरातील गवळी मोहल्ला भागातील २८ वर्षीय विष्णू रामकिसन सुपारकर असं निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जालन्यात रामनवमी निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून २८ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडी सडक परिसरात घडल्याने शहरात एकच खळबळ उडालीय. काल गुरुवारी रोजी जालना शहरात मोठ्या उत्साहात रामनवमी उत्सावानिमित्त मोठ्या उत्साहात शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर यांच्यासह शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. दरम्यान, बडी सडक परिसरातून ही शोभा यात्रा जात असताना दोन तरुणाच्या नाचण्याच्या करणावरून वाद झाला या वादाचे रूपांतर हणामारीत झालं.
यात एका तरुणाने धारदार चाकूने वार केल्याने विष्णू रामकिसन सुपारकर या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरातील नागरिकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात एकच गर्दी करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करत घेरावा घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी दवाखान्यात माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील भेट देऊन मृताच्या नातेवाईकचे सांत्वन केले आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली.
तसेच दोन आरोपी पकडल्याची माहिती मृताच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. घडलेल्या प्रकाराने रात्री उशिरापर्यंत जमाव समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता पण लोकप्रतिनिधी पोलिसांनी या जमावाला शांततेचं आवाहन केल्याने अखेर तणाव निवळला.
0 Comments