नंदुरबार / ब्रेकिंग बुलेटिन
शाश्वत स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतस्तरावरील सांडपाणी व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत ग्रामस्तरावर सांडपाणी व घनकचऱ्याचे मंजूर झालेली कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य करून लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी समन्वय राखून कामे गुणवत्तापूर्ण करावीत असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या याहा मोगी सभागृहात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामे मंजूर झालेल्या सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व सार्वजनिक शौचालयाचे ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीत उपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करताना अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक हे ही उपस्थित होते.यावेळी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात 10 ग्रामपंचयातीना सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तर 13 ग्रामपंचयातीना सार्वजनिक शौचालयाचे कामे मंजूर करण्यात आले आहेत . या ग्रामपंचयातीना प्रशासकीय मंजुरीचे आदेश अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित व उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित उपस्थिताना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर शाश्वत स्वच्छता राहावी यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व सार्वजनिक शौचालयाचे सद्यस्थितीत कामे सुरू आहेत. ही कामे चांगल्या पद्धतीने केल्यास गाव स्वच्छ व सुंदर होतील . यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी समन्वय ठेवावा. मंजूर झालेली कामे 31 मार्च अखेर पूर्ण करावीत. असे आवाहनही अध्यक्षा डॉ. गावित यांनी यावेळी केले.
0 Comments