Header Ads Widget


मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार

नंदुरबार, दि.3 डिसेंबर,2023 (जिमाका वृत्तसेवा): लोकशाहीचा स्तंभ अबाधित राखण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणुका नि:पक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक कार्यालयाची जबाबदारी आहे.  ही जबाबदारी पार पाडत असताना  प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे निवडणूक आयोगाला सहकार्य लाभत असते. हे लक्षात घेऊन यंदापासून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार जाहीर केले आहेत. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.

        मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी माहितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी निवडणूक वार्ताकन पुरस्कार दिला जाणार आहे. तर मतदार जागृतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 'मतदार-मित्र पुरस्कार' दिला जाणार आहे. 10 हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असेल. हे पुरस्कार 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात वितरीत केले जातील.

        पत्रकार आणि स्वयंसेवी संस्था या पुरस्कारासाठी स्वत: अर्ज करु शकतात त्याकरीता मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी गेल्या वर्षभरातील आपल्या कार्याचा अहवाल स्वरुप माहिती आणि छायाचित्रांसह आपला अर्ज  democracybook@gmail.com  या ई-मेल आयडीवर 7 जानेवारी, 2023 पर्यंत पाठवावा. अधिक माहितीसाठी  प्रणव सलगरकर  भ्रमणध्वनी क्रमांक 8669058325 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अवर सचिव तथा उप मुख्य निवडणूक अधिकारी  शरद दळवी  यांच्यावतीने उप जिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
0000000000

Post a Comment

0 Comments

|