नंदुरबार ! Nandurbar/LivenationNews
नवापूर येथील पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून फरार झालेल्या व नंतर पुन्हा ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी हे चंदनाच्या झाडांची तसेच तेलाची तस्करी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे नंदुरबार येथील पोलीस पथकाने मध्यप्रदेशात जावून १५ लाख ७२ हजार रुपये किमतीचे चंदनाचे तेल व लाकूड हस्तगत केले असून आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
दि.५ डिसेंबर २०२२ रोजी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील नवरंग गेटजवळ कोठडा शिवारातील एमआयडीसीकडे जाणार्या रस्त्यावर हैदर उर्फ इस्त्राईल इस्माईल पठाण (वय २०, रा.कुंजखेडा, ता.कन्नड जि.औरंगाबाद), इरफान इब्राहिम पठाण (वय३५), युसूफ असिफ पठाण (वय २२), गौसखॉ हानिफखॉ पठाण (वय ३४,सर्व रा.ब्राम्हणी गराडा ता.कन्नड जि.औरंगाबाद), अकिलखॉ ईस्माईलखॉ पठाण (वय-२२, रा.कठोरा बाजार ता.भोकरदन जि.जालना) हे दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीत असतांना एक महिंद्रा स्कार्पिओ मोटार गाडी (एमएच १३ एन ७६२६) वाहनासह मिळून आले. म्हणुन त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द् भादंवि क ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
परंतू दि.५ डिसेंबर रोजी सकाळी ९.०५ वाजेच्या सुमारास नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअपची मागील खिडकी तोडून सर्व आरोपींनी पलायन केले होते. म्हणून त्यांच्याविरुद्ध भादंवि क २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीसांच्या पथकाने फरार झालेले सर्व पाच आरोपीतांना मध्य प्रदेश व औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेण्यात आलेला आरोपी गौसखॉ हानिफखॉ पठाण हा सराईत असल्याने त्यास अधिक विचारपूस केली असता त्याने सुमारे सप्टेंबर-२०२२ मध्ये नवापूर येथे त्याच्या वरील साथीदारांच्या मदतीने चंदनाचे झाड कापून तसेच महाराष्ट्र व इतर राज्यात चंदनाचे झाड कापून ते इतर साथीदारांचे मदतीने अब्दुल रेहमान कादर रा. गवाडी ता.जि. सेंधवा मध्यप्रदेश यांना विक्री केल्याचे सांगितले.
नवापूर येथील चंदन चोरीबाबत नवापूर पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात २० हजार रुपये किमतीचे एक चंदनाचे हिरवे झाड कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार करुन मध्य प्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यात रवाना केले. पथकाने मध्य प्रदेश राज्यातील सेंधवा गवाडी गावात जावून अब्दुल रेहमान कादर याची माहिती घेतली असता, अब्दुल कादर याची एस.बी. ऍरोमॅट्रीक्स नावाची फॅक्टरी असल्याचे समजून आले. पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने अब्दुल रेहमान कादर याच्या मालकीचे एस.बी. ऍरोमॅट्रीक्स फॅक्टरीमध्ये गेले असता तेथे उपस्थित अब्दुल रहेमान अब्दुल कादर (वय-५८ मुळ रा.कुन्नीकलम हाऊस, आलंम्मपाडे ता.मुथवडे जि. कासारगड, केरळ, ह.मु. एस.बी. अरोमॅक्ट्रीक्स फॅक्टरी, गवाडी ता. निवाणी जि.बडवाणी म.प्र.), सौदागर सहदेव कोलते (वय-४६), उमेश विलास सुर्यवंशी (वय-४० दोन्ही रा. नारी ता.बारशी जि.सोलापूर यांना ताब्यात घेतले.
अब्दुल रहेमान कादर याच्या फॅक्टरीची तपासणी केली असता तेथे गौसखॉं पठाण याने दिलेली टाटा कंपनीच्या गाडीमध्ये खालच्या बाजूने दोन तीन फुटाचे लांब खाच व त्यामध्ये ५ लाख ८४ हजार रुपये किमतीचे २९२ किलो चंदनाचे लाकडाचे तुकडे मिळून आले.
म्हणून पथकाने फॅक्टरीची बारकाईने पाहणी केली असता तेथे १७ लाख ७२ हजार रुपये किमतीचे २६.०२ किलो ग्रॅम वजनाचे चंदनाचे सुगंधी तेल व चंदनाचे लाकुड वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे ७ लाख रुपये किं.चे एक टाटा कंपनीचे वाहन क्रमांक (एमएच ४६ बीएफ-०५४३) असा एकुण २८ लाख ५६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
गौसखॉं पठाण याने महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश राज्यातून चंदनाचे झाडाचे तुकडे चोरी करुन आणल्याचे ताब्यात घेण्यात आलेला अब्दुल कादर याने सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील आणखी काही चंदन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदर गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असून गुन्ह्याच्या मुळापर्यंत जावून गुन्ह्यात सहभाग असणार्यांना लवकरच ताब्यात घेवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व कोणाचीही गय केली जाणार नाही. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील चंदन चोरीचे बरेचसे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उप निरीक्षक अशोक मोकळ,
पोलीस हवालदार दिनेश वसुले, पोलीस नाईक योगेश थोरात, विनोद पराडके, हेमंत सैंदाणे, पोलीस अंमलदार गणेश बच्छे, परमानंद काळे, दिनेश बाविस्कर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव पोलीस अंमलदार अभय राजपुत यांच्या पथकाने केली.
0 Comments